मोरेश्वर मानापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुटीबोरी परिसरातील अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३८ वर्षीय कामगारावर उपचारास नऊ तास उशीर झाल्यामुळे तो दगावला. या घटनेने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण असून बुटीबोरी औद्योगिक परिसरात ईएसआयसीचे (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) हक्काचे हॉस्पिटल असावे, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजकीय रस्सीखेचमध्ये अडकलेल्या हॉस्पिटलच्या भूमिपूजनाची बुटीबोरीला प्रतीक्षा आहे.
हॉस्पिटल उभारणीला किती वर्षे?अपघातानंतर कामगाराला त्वरित उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता. हॉस्पिटलचा प्रश्न चार ते पाच वर्षे जुना आहे. या विषयावर आ. समीर मेघे, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप राऊत, माजी अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी २०१४ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात कामगार मंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेतली होती. १९ डिसेंबर २०१४ मध्ये २०० खाटांचे हॉस्पिटल मंजूर झाले. या प्रकल्पाची गती अशी आहे की, सिएट कारखान्याच्या बाजूकडील प्रकल्पाला मिळालेल्या पाच एकर जागेची रजिस्ट्री २५ जानेवारी २०१८ रोजी झाली. भूमिपूजन आणि उभारणीला किती वर्षे लागेल, यावर न बोललेच बरं.
नवीन हॉस्पिटलची गरज का?विदर्भातील तीन लाख कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आरोग्य सेवा देण्यासाठी नागपुरातील हनुमाननगर, सोमवारी क्वॉर्टर येथे हॉस्पिटल आहे. पण हॉस्पिटलची स्थिती अतिशय दयनीय आहे. डॉक्टर, तंत्रज्ञ आणि कर्मचाºयांची २५० पदे मंजूर आहेत. पण सध्या ५१ जण कार्यरत आहेत. ३७ डॉक्टरांपैकी केवळ ७ डॉक्टर पूर्णवेळ तर एक डॉक्टर अर्धवेळ कार्यरत आहे. ७६ नर्सेसपैकी २२, ५० वॉर्ड वॉयपैकी १५, २० लिपिकांपैकी २, ३० किचन स्टॉफपैकी २ तसेच प्रयोगशाळा तज्ज्ञ व एक्स-रे तज्ज्ञांची ११ पदे रिक्त आहेत. रुग्णांना ने-आण करण्यासाठी मंजूर तीन अॅम्ब्युलन्सपैकी एकही अस्तित्वात नाही. शिवाय एरियानुसार असलेल्या १६ डिस्पेन्सरीमध्ये आवश्यक ४० पैकी ८ जण कार्यरत आहेत. यात डॉक्टर नाहीतच. अशा प्रकारे ८० टक्के पदे रिक्त आहेत. अशा दयनीय स्थितीमुळे गंभीर अपघातात कामगार दगावतात. त्यानंतरही ईएसआयसीच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही, असा आरोप बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी लोकमतशी बोलताना केला.
विदर्भातून जमा होतात २० कोटी!शासनाने आरोग्य सेवेसाठी मिनिमम वेजेसची मर्यादा १५ हजारांवरून २१ हजारांपर्यंत वाढविल्यामुळे ईएसआयसीच्या आरोग्य सेवेच्या टप्प्यात येणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली. विदर्भातून एकूण तीन लाख कामगार या टप्प्यात आले. त्यात बुटीबोरी औद्योगिक परिसरातील ३५ हजार कामगारांचा ईएसआयसी योजनेत समावेश झाला. कामगार व कारखान्याचा ६.५ टक्के वाटा अर्थात महिन्याला विदर्भातून जवळपास २० कोटी ईएसआयसीकडे जमा होता. त्यात बुटीबोरीतील कामगारांकडून २.५ कोटी रुपये मिळतात या रकमेचा परतावा कामगारांना खरंच मिळतो काय, हा गंभीर सवाल असल्याचे राऊत यांनी सांगितले. राऊत म्हणाले, ईएसआयसीने बुटीबोरीला सेकंडरी दर्जात टाकले आहे. त्यामुळे नागपुरातील मोठ्या हॉस्पिटलशी ईएसआयसीचे टायअप नाही. त्यामुळे आजारी कामगारांना प्रारंभी सोमवारी क्वॉर्टरमधील हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते. नंतर डॉक्टरांनी रेफर केलेल्या हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते. पूर्वी जखमी कामगारांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये थेट भरती करण्याची सोय होती.
मुझसे मत पुछो! : शर्मासदर प्रतिनिधीने नवीन हॉस्पिटल उभारणीबाबत ईएसआयसीचे वरिष्ठ अधिकारी अमरीश शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ‘मुझसे मत पुछो’, ‘आॅफिस में आके मिलो’ असे उत्तर दिले. नंतर त्यांनी २५ जानेवारीला नवीन हॉस्पिटलच्या जागेची रजिस्ट्री झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या स्वीय सहायकाने तुम्ही खरंच पत्रकार आहात का, अशी विचारणा केली. साहेबांनी विचारण्यास सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन महिन्यात भूमिपूजन : आ. मेघेबुटीबोरी औद्योगिक परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या पाच एकर जागेची रजिस्ट्री २५ जानेवारीला झाली आहे. बुटीबोरी उड्डाण पूलासोबत या हॉस्पिटलचे भूमिपूजन दीड ते दोन महिन्यात होणार आहे. जागेची अदलाबदल झाल्यामुळे प्रकल्पाला वेळ लागल्याचे आ. समीर मेघे यांनी सांगितले.