नागपूर : मिहानमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) किडनी प्रत्यारोपणासाठी आरोग्य विभागाने हिरवी झेंडी दिल्याने शासकीय रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी असलेली प्रतिक्षा संपणार आहे. विशेष म्हणजे, मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मागील तीन वर्षांपासून प्रत्यारोपण बंद पडल्याने गरीब रुग्ण अडचणीत आले होते.
‘एम्स’ने मागील चार वर्षांत मोठी झेप घेतली आहे. सध्या १८ विविध विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. या शिवाय बर्न्स-प्लास्टिक सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, न्यूरो सर्जरी, नेफ्रोलॉजी, निओनॅटोलॉजी, कार्डिओलॉजी, कार्डिओ-थोरॅसिक सर्जरी, हेमॅटोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूक्लियर मेडिसिन, पल्मोनरी मेडिसिन, सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, सर्जिकल आॅन्कोलॉजी आणि यूरोलॉजी या सुपर स्पेशालिटी रुग्णसेवा दिली जात आहे. यामुळे बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची संख्या वाढून दोन हजारांवर गेली आहे. आता यात अवयव प्रत्यारोपणाचीही भर पडणार असल्याने याचा फायदा रुग्णांना होणार आहे.
-४००वर रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत
एकेकाळी किडनी निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील किडनी प्रत्यारोपण केंद्र आशेचे किरण ठरले होते. परंतु कोरोना काळात बंद पडलेले हे केंद्र अद्यापही सुरू होण्याचे नाव घेत नाही आहे. ‘झेडटीसीसी’नुसार एकट्या नागपूर जिल्ह्यात किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत ४०० वर रुग्ण आहेत. दरम्यानच्या काळात ‘एम्स’च्या संचालक मेजर जनरल डॉ.विभा दत्ता यांनी किडनी प्रत्यारोपण सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. यामुळे नुकतेच आरोग्य विभागाच्या पथकाने एम्स’ला भेट दिली. जागा, सोयीसुविधा व मनुष्यबळाची पाहणी करून मंजुरी दिली.
-तज्ज्ञासह यंत्र सामुग्री उपलब्ध
‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी सांगितले, ‘एम्स’मध्ये नेफ्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट तज्ज्ञासह डायलिसीसचे १३ यंत्रासह इतरही आवश्यक सोयी उपलब्ध आहेत. आरोग्य विभागाची मंजूरी मिळाल्याने लवकरच किडनी प्रत्यारोपण सुरू होईल.
-दोन रुग्ण फिट
प्राप्त माहितीनुसार, किडनी प्रत्यारोपणासाठी फिट असलेल्या दोन रुग्णांची निवड करण्यात आली. त्यांच्या कागदपत्राची तपासणी केली जात आहे. लवकरच ते ‘अॅथोरिटी’ समितीपुढे जातील. त्यांच्याकडून मंजूरी मिळताच प्रत्यारोपण होणार आहे.
किडनी प्रत्यारोपणासाठी लागणारी आरोग्य विभागाची मंजुरी मिळाली आहे. आवश्यक दस्तावेज जमवाजमव सुरू आहे. रुग्णही उपलब्ध आहे. यामुळे लवकरच किडनी प्रत्यारोपण सुरू होईल. याचा फायदा विदर्भासह आजूबाजूच्या रुग्णांना होईल.
-डॉ. विभा दत्ता, संचालक एम्स