लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकूल याेजनेतील लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. या याेजनेतील पात्र लाभार्थ्यांना राज्य शासनातर्फे दिला जाणारे अनुदान मिळाले आहे. परंतु केंद्र शासनाचा निधी अद्यापही न मिळाला नसल्यामुळे घरकुलाची कामे रखडली आहेत. परिणामी लाभार्थी कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत खापा नगर परिषद क्षेत्रात घरकूल योजनेचे २०१८-१९ आणि २०१९-२०२० या वर्षात ३१७ घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १४८ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. याेजनेतील मंजूर लाभार्थ्यापर्यंत राज्य शासनाचा निधी बरोबर पोहोचला आहे. मात्र केंद्र शासनाचा वाटा वेळेवर आला नसल्यामुळे लाभार्थ्यांना उर्वरित हप्त्यांसाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. लाभार्थ्यांना रक्कम मिळाली नसल्याने घरकुलाची कामे रखडली आहेत.
याेजनेंतर्गत घरकूल मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांनी आपले राहते घर माेडून त्याजागी घरकुलाचे बांधकाम सुरू केले आहे. आता उर्वरित अनुदान उपलब्ध न झाल्यामुळे कामे ठप्प आहेत. राहते घर ताेडल्यानंतर पात्र लाभार्थी बेघर झाल्यासारखे आहेत. याकडे लक्ष पुरवून शासनाने तातडीने उर्वरित धनादेश द्यावे, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
....
घरकूल याेजनेंतर्गत राज्य शासनातर्फे ७९ लाख ६० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, केंद्र शासनाचा २ काेटी २२ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. हा निधी प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना लवकरात लवकर धनादेश वाटप करण्यात येईल.
- माेनेश रेवतकर, अभियंता, नगर परिषद, खापा.