निशांत वानखेडे
नागपूर : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जाेडप्यांना प्राेत्साहन सरकारकडूनही सानुग्रह अनुदान देण्याची याेजना आहे. मात्र काेराेनामुळे दाेन वर्षापासून या याेजनेला खीळ बसली आहे. २०१९-२० आणि २०२०-२१ या काळात प्राेत्साहन अनुदानासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयात प्राप्त अर्जापैकी ९५० जाेडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा लागून आहे. केंद्र शासनाच्या याेजनेच्या लाभासाठीही ४५ जाेडप्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. २०१९ च्या सुरुवातीला ३७६ जाेडप्यांना मात्र राज्याच्या याेजनेचा लाभ मिळाला आहे.
समाजातील जाती धर्माच्या भिंती माेडून पाडण्यासाठी वेगवेगळ्या जातीधर्माच्या लाेकांमध्ये राेटी बेटी व्यवहार व्हावे, ही संकल्पना अनेक वर्षापासून समाज सुधारकांनी मांडली आहे. समाजाने ती अजूनही आत्मसात केली नसली तरी प्रेमसंबंधातून का हाेईना या संकल्पनेला चालना मिळत आहे. सामाजिक समता प्रस्थापित व्हावी म्हणून शासनाकडूनही आंतरजातीय विवाह करणाऱ्या जाेडप्यांना अनुदान दिले जाते. मात्र गेल्या वर्षीपासून काेराेना महामारीच्या प्रकाेपामुळे अनेक याेजनांना खीळ बसली आहे. त्याचप्रमाणे या याेजनेलाही फटका बसला आहे. केंद्र शासन व राज्य शासनाकडूनही या याेजनेसाठी दाेन वर्षात निधी मिळू शकलेला नाही. जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात आंतरजातीय विवाह अनुदानासाठी अर्ज करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. विभागाला दरवर्षी ७०० ते ८०० अर्ज प्राप्त हाेतात. २०१९ व २०२० मध्ये हा आकडा कायम आहे.
- जिल्हा नाेंदणी कार्यालयात दरवर्षी २८०० ते ३००० विवाहांची नाेंद हाेते. दाेन वर्षात जवळपास ६००० विवाहाची नाेंद झाली. त्यातील १५०० च्यावर आंतरजातीय विवाह हाेते. अनुदानासाठी विभागाकडे १४०० च्या जवळपास अर्ज प्राप्त झाले.
- २०१९ मध्ये १ काेटी ८८ लाख रुपये निधी मिळाला हाेता, ज्यामधून ३७६ जाेडपे लाभार्थी ठरले.
- ९५० च्या जवळपास जाेडप्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.
- केंद्र शासनाच्या याेजनेसाठीही ४५ जाेडप्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.
राज्याकडून ५० हजार, केंद्राकडून अडीच लाख
आंतरजातीय विवाह प्राेत्साहन याेजनेत राज्याकडून ५०,००० रुपये अनुदान दिले जाते. यामध्ये ५० टक्के राज्याचा तर ५० टक्के वाटा केंद्र शासनाचा असताे. केंद्र शासनाकडूनही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन पुरस्कृत आंतरजातीय विवाह प्राेत्साहन याेजना स्वतंत्रपणे राबविली जाते, ज्यामध्ये जाेडप्यांना २.५० लाख रुपये लाभ मिळताे.
कुणाला मिळते मदत
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बाैद्ध, शीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास. तसेच मागासवर्गीयातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विवाहित जाेडप्यांना या याेजनेतून ५० हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते.
समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी आंतरजातीय विवाह हाेणे आवश्यक आहे आणि अशा जाेडप्यांना प्राेत्साहित करण्यासाठी सरकारची ही याेजना महत्त्वपूर्ण आहे. आमच्या विभागाकडूनही यासाठी माेठ्या प्रामाणात जनजागृती केली जाते. यामुळेच इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपुरात सर्वाधिक अर्ज असतात. काेराेनामुळे बऱ्याच गाेष्टींना कात्री लागली आहे. मात्र निधी प्राप्त झाला की प्रतीक्षा करणाऱ्यांनाही लाभ मिळेल.
- बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी