नागपूर विद्यापीठ : निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य शासनाचा अध्यादेशनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरणांच्या निवडणुका एक वर्ष समोर ढकलण्याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. ३१ आॅगस्ट रोजी प्राधिकरणांचा कालावधी संपुष्टात येत आहे. दरम्यान, राज्य शासनाने निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात अध्यादेश काढला आहे. संबंधित अध्यादेश हा राज्यपालांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.राज्यातील सर्व पारंपरिक विद्यापीठांसाठी सध्या असलेला महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ हा रद्द करून नवीन सर्वसमावेशक असा कायदा राज्य सरकारकडून डिसेंबरमध्ये आणण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या सिनेट, विद्यापीठ प्राधिकरणे, मंडळे आदींच्या निवडणुका पुढे ढकलण्याची चर्चा सुरू आहे. यासाठी राज्य सरकारने नवीन अध्यादेश जारी केला आहे. महाराष्ट्र विद्यापीठे (विद्यापीठ प्राधिकरणे व इतर मंडळे यांच्या सदस्यांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे) अधिनियम, २०१५ असे या अध्यादेशाचे नाव आहे. या अध्यादेशामुळे नागपूर विद्यापीठाकडून सुरू असलेल्या विधिसभेच्या निवडणूक प्रक्रियेवरही परिणाम होणार असून, ही प्रक्रिया विद्यापीठाला आपोआपच थांबवावी लागणार आहे.(प्रतिनिधी)
निवडणुकांसंदर्भातील अध्यादेशाबाबत प्रतीक्षा
By admin | Published: August 26, 2015 3:11 AM