नागपूर : मागील दोन वर्षांपासून महानगर पालिकेत कार्यरत असलेले दोन डझनांहून अधिक स्थापत्य अभियांत्रिकी कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. काहींच्या नोकरीला वर्षभराचा तर काहींना सहा महिन्यांचा काळ उरला आहे. मनपाच्या विभागीय पदोन्नती समितीने (डीपीसी) संबंधितांना कनिष्ठ अभियंता पदावर (जेई) पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी यादीही तयार झाली. मात्र कोरोना संक्रमणामुळे कामाला विलंब होत असल्याचे कारण सांगून मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात चालढकल होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नॉन टेक्निकल स्टाफला दोन महिन्यांपूर्वी पदोन्नती देण्यात आली. मे व जून महिन्यातच ही यादी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र सामान्य प्रशासन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी यादी दडपून ठेवली. यामुळे फाईल पुढे सरकलीच नाही.
एका स्थापत्य अभियंत्याने दिलेल्या माहितीनुसार, सामान्य प्रशासन विभागात मागील काळात किमान चार वेळा यादीसंदर्भात माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मनपामध्ये अधिकाऱ्यांची संख्याही बरीच कमी झाली आहे. अनेक कर्मचारी कालबद्ध पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. चेहरा पाहून पदोन्नती देण्याचा प्रकार योग्य नसल्याचे या अभियंत्याने सांगितले. पदोन्नती समितीने यादी मंजूर केली असेल तर ती मंजूर करून तातडीने जाहीर केली जावी, अशी मागणी होत आहे.