दिनकर ठवळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोराडी : संपूर्ण राज्यात सर्वाेत्कृष्ट ठरणारे तालुका क्रीडा संकुल काेराडी येथे साकारण्यात आले. परंतु या बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचे काम अजूनही रखडले असून, त्याच्या लाेकार्पणासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. दाेन वर्षांपूर्वी अपेक्षित असलेले हे क्रीडा संकुल अद्यापही उपलब्ध न झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर व्यक्त हाेत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा क्रीडा विभाग व महानिर्मितीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत साडेआठ कोटी रुपयांच्या निधीतून काेराडी येथे बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाचे बहुतेक काम पूर्ण झाले असून, आवश्यक सर्व क्रीडा साहित्य कित्येक दिवसांपासून याठिकाणी येऊन पडले आहे. अत्याधुनिक व वातानुकूलित असलेल्या आणि सर्व क्रीडाप्रेमींना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या या क्रीडा संकुलाला अनेक दिवसांपासून लोकार्पणाचे डोहाळे लागले आहे.
या क्रीडा संकुलाच्या छतावर बसविण्यात येणाऱ्या सौरऊर्जा पॅनलच्या उभारणीत छताला अनेक ठिकाणी छिद्रे पडली. यामुळे पावसाचे पाणी संकुलात गळायला सुरुवात झाली. त्यामुळे संबंधित विभागाला क्रीडा संकुलावरील छतावर दुसरे छत टाकण्याची गरज पडली. पहिल्या छताला छिद्रे पडल्याने त्यावर दुसरे छत टाकण्यात आले आणि त्यावर आता सौरऊर्जेचे पॅनल पुन्हा बसवायला सुरुवात झाली आहे. हे काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे या क्रीडा संकुलाच्या लोकार्पणाला विलंब होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विरांगणा राणी अवंतीबाई या नावाने साकारलेले हे क्रीडा संकुल जागतिक दर्जाचे आहे. येथे उपलब्ध साेयीनुसार अशाप्रकारचे क्रीडा संकुल राज्यात कुठेही तालुकास्तरावर नाही. पर्यटन व तीर्थक्षेत्रात नावारूपाला येणाऱ्या कोराडीच्या वैभवात क्रीडा संकुल नक्कीच भर घालणार आहे. या संकुलात टेनिस, सहा बॅडमिंटन कोर्ट, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंच, पाचशे प्रेक्षकांची गॅलरी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र जिम आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संकुलाला सौरऊर्जेतून वीज प्राप्त होणार आहे. ग्रामपंचायतीसोबत झालेल्या करारानुसार याठिकाणी उत्पादित झालेली सोलर वीज क्रीडा संकुलाच्या वापरानंतर कोराडी ग्रामपंचायतीला मिळणार आहे.
...
दाेन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करू
या क्रीडा संकुलातील उर्वरित कामे अंतिम टप्प्यात असून, ही कामे लवकरच पूर्ण केली जाणार आहेत. क्रीडा संकुल चालविण्यासाठी एजन्सी नेमावयाची आहे. याबाबत लवकरच निविदा काढून एजन्सी ठरविण्यात येईल. साधारणतः ही प्रक्रिया दीड ते दोन महिन्यात पूर्ण होईल व या उन्हाळी क्रीडा स्पर्धेसाठी हे संकुल क्रीडाप्रेमींना उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी दिली.
....
आता अधिक विलंब नको
कोराडीसाठी वैभव ठरणारे तालुका क्रीडा संकुल अपेक्षेनुसार उशिराने उपलब्ध होत आहे. उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करून हे क्रीडा संकुल नागरिकांसाठी उपलब्ध करून द्या. या कामात आणखी दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचे मत सरपंच नरेंद्र धानाेले, उपसरपंच आशिष राऊत यांनी व्यक्त केले.