नागपूर : भारतात दरवर्षी ५ लाख लोकांचा अवयवांच्या प्रतीक्षेत मृत्यू होतो. यातील २ लाख लोक यकृताच्या आजाराने मरतात. देशात वर्षाला जवळपास २५ हजार यकृत प्रत्यारोपणाची गरज असताना १ हजार ५०० सुद्धा प्रत्यारोपण होत नाही. ही संख्या वाढविण्यासाठी अवयावाची पुनर्प्राप्ती (रिट्रीव्हल) केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे. नागपुरात सध्या यकृत रिट्रीव्हल केंद्राची संख्या ६ असून गुरुवारी यात आणखी एका केंद्राची भर पडली. यामुळे ‘ब्रेन डेड’ रुग्णाकडून यकृत प्रत्यारोपणाची प्रतिक्षा कमी होण्याची शक्यता आहे.
दारूचे व्यसन असेल तरच लिव्हर (यकृत) खराब होत असे नाही, यकृताच्या आजाराचे अनेक कारणे आहेत. हेपेटायटिस बी व सी, अनियंत्रित मधुमेह, रक्तदाब व कॉलेस्ट्रॉल व अलिकडे लठ्ठपणामुळे होणारे ‘फॅटी लिव्हर’ हेही एक महत्त्वाचे कारण ठरले आहे. विवेका हॉस्पिटलचा गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अभिजीत देशमुख म्हणाले, रोज मद्यपान करणाºयांमध्ये फॅटी लिव्हर सामान्य आहे. परंतु अल्कोहोल न पिणाºयांमध्येही ते मोठ्या प्रमाणात दिसून येते. याला ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ म्हणतात. जास्त प्रमाणात चरबीमुळे यकृतावर सूज देखील दिसून येते, ज्याला ‘नेश’ किंवा ‘नॉन-अल्कोहोलिक स्टीटो हेपेटायटीस’ म्हटले जाते.
यामुळे विवेका हॉस्पिटलमध्ये सुरू झालेले ‘लिव्हर रिट्रीव्हल’ केंद्रामुळे ‘ब्रेन डेड’म्हणजे मेंदू मृत रुग्णांकडून मिळालेले यकृत ‘झेडटीसीसी’च्या नियमानुसार गरजू रुग्णांना उपलब्ध होईल. ‘ब्रेन डेड’ झालेल्या एका ६० वर्षीय रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या मंजुरीनंतर ‘झेडटीसीसी’ मार्गदर्शनात गुरुवारी यकृत व बुबूळाचे रिट्रीव्हल करण्यात आले. न्युरोलॉजिस्ट डॉ. ध्रुव बत्रा म्हणाले, ‘ब्रेन डेड’ रुग्णाकडून होत असलेल्या अवयवदानामुळे मृत्यूच्या दाढेत जगणाºया रुग्णांना नवे जीवन मिळणे शक्य झाले आहे.-मॅकेनिकल इंजिनियरचे अवयवदान
व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनियर असलेले सुनील जोशी (६०) रा. राणाप्रतापनगर यांना तीव्र स्वरुपाचा ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याने विवेका हॉस्पिटलमध्ये भरती केले. शर्तीचे उपचार सुरू होते. परंतु त्यांची प्रकृती खालावत गेले. हॉस्पिटलचे डॉ. निखील बालंखे, डॉ.धु्रव बत्रा, डॉ. देवेंद्र देशमुख, डॉ. सारंग क्षीरसागर व डॉ. विक्रम अळसी यांनी तपासून त्यांचे ‘ब्रेन डेड’ झाल्यचे घोषीत केले. जोशी यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करीत त्यांना अयवदानासाठी प्रेरीत केले. त्या दु:खातही त्यांच्या पत्नी सुप्रिया जोशी व त्यांचे भाऊ अजय जोशी यांनी अवयवदानाला मंजुरी दिली. विवेका हॉस्पिटलमध्येच यकृत व बुबुळाचे रिट्रीव्हल करण्यात आले. झेडटीसीसीने त्यांचे यकृत किम्स किंग्जवे हॉस्पिटलच्या एका रुग्णाला तर बुबूळ महात्मे आय बँकेला दान केले.