बुधवारी बाजार रस्त्यावर
नागपूर : सक्करदरा येथील बुधवारी बाजारासाठी मोठी जागा असताना संपूर्ण बाजार रस्त्यावरच भरतो. विशेष म्हणजे, हा बाजार सातही दिवस भरतो. यामुळे या भागात नेहमीच रहदारीची कोंडी होते. तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी रस्त्यावरील बाजारावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यावेळी हा बाजारही आपल्या जागेवर भरत होता; परंतु आयुक्त बदलताच हा बाजार रस्त्यावर आल्याचे बोलले जात आहे.
सिमेंट रस्त्यांचे जोड, धोकादायक
नागपूर : वंजारीनगर पाण्याची टाकी ते तुकडोजी महाराज चौक मार्गाच्या दोन्ही भागातील रस्त्याचे सिमेंटीकरण झाले; परंतु रामेश्वरी रस्ता या मार्गाला अद्यापही जोडण्यात आला नाही. कंत्राटदाराने येथे तात्पुरते सिमेंट टाकून रस्ता तयार केला आहे; परंतु वाहनांच्या रहदारीमुळे सिमेंट उखडून गिट्टी बाहेर आली आहे, शिवाय प्रचंड धूळही उडते. अपघात झाल्यावर याकडे प्रशासनाचे लक्ष जाईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.