लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन काळात आलेले वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणी तीव्र होत चालली आहे. भाजपानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी संविधान चौकात मोर्चा काढून ही मागणी लावून धरली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यापासून रोखल्यामुळे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करून नाराजी व्यक्त केली.
मनसेने पोलिसांकडे मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु त्यांना परवानगी मिळाली नाही. यानंतरही मनसे कार्यकर्ते सकाळी संविधान चौकात एकत्र झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यकर्त्यांनी प्रदेश महासचिव हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु विधानभवनाकडे जाताच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून कार्यकर्त्यांना अडवले. बॅरिकेड्स हटविण्याची मागणी करीत कार्यकर्ते ऊर्जामंत्री व राज्य सरकारविरोधात नारेबाजी करू लागले तसेच तिथेच धरण्यावर बसले. तणाव वाढत असल्याने पोलीस अधिकारी पक्षाच्या शिष्टमंडळास जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घेऊन गेले. यावेळी मनसेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर केले. तसेच वीज बिलाच्या नावावर नागरिकांची लूट सुरू राहिली तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. आंदोलनात प्रवीण बरडे, किशोर सरायकर, अजय ढोके, विशाल बडगे, सतीश कोल्हे, सचिन धोटे, श्याम पुनियानी, आदित्य दुरुगकर, दिनेश इलमे, घनश्याम निखाडे, प्रशांत निकल, महेश जोशी, मनीषा पापडकर आदी सहभागी झाले होते.
विदर्भवाद्यांनी कार्यालयाला लावले टाळे
कोरोना काळातील वीज बिलापासून मुक्त करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीने मोर्चा काढला. तसेच ऑटोमोटिव्ह चौकातील महावितरणच्या कार्यालयाला टाळे लावले. यादरम्यान कार्यकर्त्यांची पोलिसांशी धक्काबुक्की झाली. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. समितीचे युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासूरकर यांनी नागरिकांना बिल न भरण्याचे व कनेक्शन कापण्यास येणाऱ्या वीज कर्मचाऱ्यास काठीने बदडण्याचे आवाहन केले.
अंगुलीमालनगर येथून हा मोर्चा प्रशांत मुळे व ज्योती खांडेकर यांच्या नेतृत्वात निघाला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही आंदोलनकर्ते कार्यालयापर्यंत पोहोचले. कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही कार्यकर्त्यांनी कार्यालयााला कुलूप लावले. आंदोलनात प्यारूभाई ऊर्फ नौशाद हुसैन, रवींद्र भामोडे, योगेश कानोळकर, राजेंद्र सतई, रेखा निमजे, स्वाती नागपुरे, कृष्णा मोहबिया, उषा लांबट आदी सहभागी झाले होते.
पदाधिकारी बेशुद्ध, रुग्णालयात भरती
मोर्चाला कार्यालयात जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांना बराच प्रयत्न करावा लागला. दरम्यान विदर्भ राज्य आंदोलन समितीने असा आरोप केला आहे की, पोलिसांनी ज्योती खांडेकर यांचे केस पकडून खाली पाडले. यात त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.