बांधकाम साहित्यामुळे पावसाळी नाल्या बंद झाल्यास कंत्राटदारावर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता पावसाळ्यापूर्वी अर्धवट सिमेंट रोडची कामे पूर्ण झाली असती तर गुरुवारी झालेल्या जोराच्या पावसामुळे अर्धवट सिमेंट रोड लगत व वस्त्यात पाणी साचले नसते. ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर मनपातील पदाधिकाऱ्यांना जाग आली आहे. शुक्रवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सिमेंट रोडची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
शहरात सुरू असलेल्या सिमेंट रोड बांधकामामुळे बांधकाम साहित्य विखुरलेले आहे. यामुळे पावसाळी नाल्या बंद झाल्या आहेत. नाल्या बंद झाल्यास संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. मनपा मुख्यालयात शुक्रवारी स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी महापौरांसह स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक विजय झलके, मुख्य अभियंता अजय पोहेकर, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) सोनाली चव्हाण उपस्थित होते.
शहरातील सिमेंट रोडच्या टप्पा १, २ व ३ च्या कामाचा महापौर व स्थापत्य समिती सभापतींनी आढावा घेतला. सिमेंट रोड टप्पा १ चे अनेक कामे बाकी आहेत. सिमेंट रोड टप्पा २ चे सुद्धा उर्वरित व अर्धवट कार्य त्वरित पूर्ण करणे तसेच सिमेंट रोड टप्पा ३ च्या कामासाठी नासुप्रकडून ३७.०५ कोटी व राज्य शासनाकडून ३७.०५ कोटी निधी अप्राप्त आहे. दोन्ही विभागाकडून अप्राप्त निधी मिळविण्यासाठी प्रशासनाद्वारे त्वरित प्रयत्न करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
रामदासपेठ येथील पूर्णचंद्र बुटी सभागृहाजवळ नागनदीवर असलेल्या पुलाच्या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष स्थळी जाऊन पुलाचे अवलोकन करा, जम्मूदीप नगर नाल्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत असल्यामुळे नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. हे काम पूर्णत्वास आणण्यासाठी राज्यशासनाकडून अप्राप्त असलेली राशी मिळविण्यासाठी प्रशासनाद्वारे विशेष प्रयत्न करण्याचे त्यांनी निर्देश दिले.