लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : जलालखेडा (ता. नरखेड) येथे दिवसागणिक काेराेना रुग्णांमध्ये वाढ हाेत असल्याने गावाची हाॅटस्पाॅटच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. सर्वाधिक रुग्ण गावातील वाॅर्ड क्रमांक-२ मध्ये आढळून आले आहेत. मंगळवारी (दि. २३) ११ नवीन रुग्णांची भर पडली असून, साेमवारी (दि. २२) एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काेराेना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात प्रतिबंधात्मक उपाययाेजनांवर विचारविमर्श करण्यात आला.
काेराेना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाच्या वतीने काही प्रतिबंधात्मक उपाययाेजना सुचिवण्यात आल्या आहेत. त्यावर काटेकाेर अंमल करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. गावातील सर्व दुकानदार व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची काेराेना टेस्ट अनिवार्य करण्यात आली असून, सर्वांना मास्क वापरण्याची सक्ती करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, शाळा, शिकवणी वर्ग, आठवडी बाजार, कार्यालय, सर्व राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम ७ मार्चपर्यंत बंद ठेवणे, हॉटेल, रेस्टाॅरंट रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवणे, शनिवार व रविवारी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवणे, राेज लाऊडस्पीकरच्या माध्यमातून जनजागृती याबाबत निर्णय घेण्यात आले.
या सभेला सरपंच कैलास निकोसे, उपसरपंच मयूर सोनोने, ग्रामपंचायत सदस्य अधीर चौधरी, सुरेश बारापात्रे, मयूर दंढारे, ईश्वर उईके, रजनी कळंबे, माधुरी चौरे, अर्चना लिखार, रुबीना मिर्झा, माजी सदस्य प्रमोद पेठे, अतुल पेठे, सुधीर खडसे, कैलास चौधरी, विलास भालसागर, योगेश त्रिपाठी, मनोज खुटाटे, पवन कळंबे, हुरबेग मिर्झा, प्रशांत देशमुख, ग्रामविकास अधिकारी सुनील ईचे यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते.