सुमेध वाघमारे
नागपूर : पहिला व्हिडीओ : लग्नात नाचत असताना अचानक एक व्यक्ती खाली पडते. लोकांना वाटते की, ‘डान्स स्टेप’ असेल; पण थोड्याच वेळाने त्याचा मृत्यू झाल्याचे पुढे येते. दुसरा व्हिडीओ : बस चालवत असताना अचानक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. रस्त्यावरील अनेकांना बसची धडक बसते. तिसरा व्हिडीओ : जिम ट्रेनर खुर्चीवर बसलेला असतो. अचानक तो मागे वळून पाहतो आणि खाली कोसळतो. नंतर तो उठतच नाही.
या सारखे काही व्हिडीओ ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ होत आहेत. सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. काही जण याचा कोरोना लसीशी संबंध लावत आहे. लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होत असल्याचा दावा करीत आहे; परंतु, हृदयरोगतज्ज्ञांनी याला फेटाळून लावले आहे.
- काय आहे ‘सडन कार्डिॲक अरेस्ट’ -डॉ. हरकुट
ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट म्हणाले, ‘सडन कार्डिॲक अरेस्ट’ म्हणजे अचानक हृदयविकाराचा झटका येतो. ही एक जीवघेणी स्थिती आहे. ज्यामध्ये हृदयाचे काम करणे थांबते. हृदय रक्त पंप करत नाही. यामुळे अवयवांना रक्तपुरवठा होत नाही आणि मृत्यूचा धोका निर्माण होतो. ‘सडन कार्डिॲक अरेस्ट’मागे अनेक कारणे असली तरी अयोग्य जीवनशैली हे एक महत्त्वाचे कारण आहे. याचा कोरोना लसीशी कोणताही संबंध नाही. असा कुठलाही ‘स्टडी’ समोर आलेला नाही.
- फार कमी लोकांना तातडीने उपचार मिळतात -डॉ. जगताप
ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, अनुवांशिकदृष्ट्या भारतीयांना ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’चा धोका अधिक राहतो. यामुळे काहींमध्ये ‘सडन कार्डिॲक अरेस्ट’ येण्याची जोखीम असते. शिवाय, आपण अधिक प्रमाणात ‘कार्बोहायड्रेट्स’ आणि ‘ट्रांस फॅटी ॲसिड्स’ आहार घेतो. परिणामी, वजन वाढते. पोट वाढण्याकडेही सामान्यप्रमाणे पाहतो. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह आणि रक्तातील असामान्य ‘लिपिड्स’चे कारण ठरते. ‘सडन कार्डिॲक अरेस्ट’ आल्यानंतर फार कमी लोकांना तातडीने उपचार मिळतात. यामुळे मृत्यूचा धोका अधिक पटीने वाढतो.
- अयोग्य जीवनशैली ठरतेय कारणीभूत -डॉ. अर्नेजा
ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा म्हणाले, असामान्य हृदयाच्या ठोक्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येतो. या मागे अनेक कारणे असली तरी अयोग्य जीवनशैली हे एक महत्त्वाचे कारण आहे. अयोग्य व अवेळी आहार, व्यायामाचा अभाव व तणावामुळे याचा धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्या. मुधमेह नियंत्रणात ठेवा. नियमित व्यायाम व तणावाचे व्यवस्थापन करा.