सावनेर : हल्ली तरुण-तरुणींमध्ये कानाला ‘इअर फाेन’ लावून गाणी ऐकत किंवा गप्पा करीत वाहने चालविणे, राेडने पायी चालण्याचे ‘फॅड’ वाढत आहे. या बाबी जीवावर बेतू शकतात, याची त्यांना कल्पना असली तरी ते त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. अशीच घटना सावनेर शहरातून गेलेल्या ‘रेल्वे ट्रॅक’वर शनिवारी (दि. ५) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. यात मागून आलेल्या रेल्वे इंजिनने धडक दिल्याने तरुणाला घटनास्थळीच जीव गमवावा लागला.
यश उमेश गडवाल (२२, रा. सावनेर) असे मृताचे नाव आहे. यश आई, वडील व माेठ्या भावासाेबत सावनेर शहरात किरायाने राहायचा. ताे बॅनरची कामे करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावायचा. त्यालाही इतर तरुणांप्रमाणे कानाला ‘इअर फाेन’ लावून गाणी ऐकण्याचा छंद हाेता. तो शनिवारी सायंकाळी शहरातील पाटबंधारे काॅलनीलगत गेलेल्या नागपूर-छिंदवाडा रेल्वेलाईनच्या दाेन्ही रुळाच्या मध्यभागातून रेल्वेस्थानकाच्या दिशेने चालत जात हाेता. मागून अर्थात छिंदवाड्याहून नागपूरच्या दिशेने जात असलेले रेल्वे इंजिन आले. ताे समाेर दिसताच लाेकाेपायलटने हाॅर्नदेखील वाजवला. परंतु, गाण्याच्या आवाजामुळे त्याला हाॅर्न ऐकायला आला नाही. ताे वेळीच बाजूला न झाल्याने इंजिन त्याला धडक देऊन निघून गेले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
---
‘गेम’ खेळण्याचे आवडते ठिकाण
नागपूर-छिंदवाडा रेल्वेमार्गाचे नुकतेच ‘ब्राॅडगेज’मध्ये रूपांतर करण्यात आले. या मार्गावर राेज प्रवासी गाड्यांच्या चार फेऱ्या आहेत. ‘लाॅकडाऊन’पासून या मार्गावरील प्रवासी गाड्यांच्या फेऱ्या बंद असून, मालगाड्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. गाड्यांच्या फेऱ्या बंद असल्याने रेल्वेलाईन परिसरातील काही तरुण ‘ट्रॅक’वर बसून, माेबाईलवर ‘पबजी’ किंवा इतर ‘गेम’ खेळत असतात. ‘ट्रॅक’वर बसणे धाेक्याचे असते तरी ते तरुणांचे आवडते ठिकाण बनले आहे.