नागपूर : प्रामाणिकपणा कुठे विकत मिळत नाही अन् कोणतेही आमिष त्याला खरेदी करू शकत नाही. रस्त्यावर पडलेले नोटांनी भरलेले पाकीट सापडूनही दोन मुलांना त्याची भुरळ पडली नाही. त्यांनी ते पाकीट पोलीस ठाण्यात आणून जमा केले. निमेश भगवान सोनकुसरे (वय १८) आणि प्रतीक सुनील धकाते (१४) हे बुधवारी दुपारी सहज फिरत असताना त्यांना रस्त्यावर एक पैशाचे पाकीट सापडले. ते नोटांनी भरलेले होते. गांधीबाग हा भाग अत्यंत वर्दळीचा आहे. त्यामुळे ते कुणाचे पाकीट आहे, हे कळणे शक्य नव्हते. त्यामुळे निमेश आणि प्रतीक या दोघांनी तहसील पोलीस ठाणे गाठले. डे ऑफिसर नंदकिशोर हिंगे यांना ते पाकीट त्यांनी सोपविले. त्यात १४,२०० रुपये होते. त्या पाकिटामधील कार्डच्या आधारे मुकुंद आणि वैभव नामक पोलिसांनी अवघ्या काही तासांतच पाकिटाच्या मालकाचा शोध घेतला. ते पाकीट आणि रक्कम केळीबाग, महालमधील रुतल राजेश जोशी यांचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जोशी यांना पोलीस बोलावून घेण्यात आले आणि त्यांचे पाकीट त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. या प्रामाणिकतेबद्दल निमेश आणि प्रतीक यांचा ठाणेदार जयेश भांडारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
नोटांनी भरलेले पाकीट दोन मुलांनी केले परत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 12:09 PM