लाेकमत न्यूज नेटवर्क
चिचाळा : सतत सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे घराच्या भिंती खिळखिळ्या झाल्या आणि त्या गुरुवारी (दि. १६) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास अचानक काेसळल्या. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना चिचाळा नजीकच्या पाहमी (ता. भिवापूर) येथे घडली.
ज्ञानेश्वर कापसू पडोळे (रा. पाहमी, ता. भिवापूर) यांच्या घराने बांधकाम जुने व माती-दगडांचे आहे. या परिसरात सात दिवसांपासून पाऊस बरसत आहे. त्यातच गुरुवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसला. घराचे छत काैलारू असल्याने भिंतीत पावसाने पाणी मुरल्याने ती खिळखिळी झाली हाेती. भिंतीची माती सैल झाल्याने ती मध्यरात्रीच्या सुमारास अचानक काेसळली. या भिंतीजळ कुणीही झाेपत नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही.
भिंतीलगत विहीर असल्याने भिंतीची माती व दगड विहिरीत पडल्याने ती बुजल्यागत झाली. याच पावसामुळे आनंद पिल्लेवान, रा. पाहमी यांच्या घराचीही भिंत गुरुवारी रात्री काेसळली. घटनेच्यावेळी आनंद पिल्लेवान यांच्या आई घराच्या दर्शनी भागात झाेपल्या असल्याने त्यांच्याकडेही कुणाला दुखापत झाली नाही. त्यांचेही घर जुने व माती-दगडांनी बांधलेले आहे. दाेघांचीही आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शासनाने त्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.