राम वाघमारे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : विजेच्या तारांवरील लाेंबकळलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित हाेण्यापासून तर शाॅर्टसर्किट हाेणे, तारा तुटणे यांसह अन्य प्रकार घडतात. संभाव्य धाेका टाळण्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मान्सूनपूर्व कामे हाती घेतली. यात कर्मचाऱ्यांनी तब्बल ७०० कि.मी.ची भटकंती करीत झाडांच्या फांद्या ताेडण्यापासून तर जुन्या तारा, इन्सुलेटर बदलविणे यांसह इतर कामे केली.
पावसाळ्यात वीजवहनामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण हाेऊ नये म्हणून महावितरण कंपनीच्या भिवापूर तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी भिवापूर, नांद, धामणगाव, आलेसूर, बेसूर, झमकाेली यांसह अन्य भागांत भटकंती करीत ही कामे पूर्णत्वास नेली आहेत. भिवापूर तालुक्यात विजेच्या बहुतांश तारा जंगलातून गेल्या आहेत. काही ठिकाणी विजेच्या खांबालगत झाडे असून, त्या झाडांच्या फांद्या तारांपर्यंत पाेहाेचल्या आहेत; तर वेली तारांना गुरफटलेल्या आहेत. फांद्या व वेली अपघातांना निमंत्रण देणाऱ्या ठरतात. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित हाेण्याचे प्रकारही घडतात.
पावसाळ्यात निर्माण झालेला विजेचा फाॅल्ट शाेधून काढताना कर्मचाऱ्यांची दमछाक हाेते. वीजपुरवठा वेळीच सुरळीत झाला नाही तर कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या राेषालाही सामाेरे जावे लागते. त्यामुळे महावितरण कंपनीने ही माेहीम एप्रिलमध्ये सुरू केली असून, कर्मचाऱ्यांनी ७०० कि.मी.ची भटकंती करीत फांद्या ताेडून व वेली काढून ती पूर्णत्वास आणली. यात वादळ व पावसामुळे काही अडचणी आल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
...
मुख्यालय सोडल्यास कारवाई
प्रत्येक पावसाळ्यात भिवापूर तालुक्यातील विजेचा लपंडाव सर्वश्रुत आहे. त्यातून अपघातही घडतात. ही मान्सूनपूर्व कामे पूर्ण हाेईपर्यंत कुणीही मुख्यालय साेडायचे नाही, असे आदेश महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिले हाेते. यात कसूर केल्यास कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या हाेत्या. कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून ही कामे करणे बंधनकारक केले हाेते. त्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून ही जबाबदारी पार पाडली.
...
तीन हजार इन्सुलेटर बदलले
वीजवहनात इन्सुलेटर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. पावसाळ्यात इन्सुलेटर फुटून शाॅर्टसर्किट व वीजपुरवठा खंडित हाेण्याचे प्रकार अधिक घडतात. इन्सुलेटर फुटल्यास खांब अथवा त्याच्या आधाराच्या तारांमध्ये वीजप्रवाह प्रवाहित हाेताे व त्यातून प्राणहानी हाेण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या माेहिमेत भिवापूर तालुक्यातील तीन हजार पिन इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटर बदलण्यात आले आहेत. शिवाय, ६० ट्रान्सफाॅर्मरचे ऑईल टाॅपअप केले; तर १५ ठिकाणचे डीटीसी केबल, २५० विजेचे माेडकळीस आलेले खांब बदलण्यात आले असून, ४८ नवीन खांब लावण्यात आले. ५० ठिकाणी विजेच्या नवीन तारा ओढण्यात आल्या आहेत.
...
विजेचा तारा तुटल्यास नागरिकांनी त्याला स्पर्श न करता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सूचना द्यावी. झाडात वीजप्रवाह प्रवाहित झाल्यास लगेच कळवावे. ग्राहकांना कुठलीही समस्या आल्यास त्यांनी फाेन करून माहिती द्यावी. ब्रेकडाऊन असल्यास लगेच दुरुस्ती केली जाईल.
- दामोदर उरकुडे, उपकार्यकारी अभियंता,
महावितरण कंपनी, भिवापूर.