मंगेश व्यवहारे
नागपूर : शहरातील रहाटेनगर टोली ही मांग गारुडी जमातीची वस्ती. आख्ख्या शहरात ही वस्ती दारूसाठी प्रसिद्ध आहे. दारूविक्रीबरोबरच कबाड वेचणे, भीक मागणे, म्हशी भादरणे, कानातील मळ काढणे, पिढ्यान्पिढ्यांपासून यांचे हेच कामधंदे आहे. अशा गढूळ वातावरणात येथील वयात आलेल्या मुलींचे आयुष्यसुद्धा गुरफटून जायचे. पण गेल्या वर्षभरात येथील काही तरुण मुलींमध्ये आत्मसन्मानाची जाणीव झाली आणि या गढूळ वातावरणातून बाहेर पडण्याची उमेद त्यांच्यात निर्माण झाली. परंपरागत कामधंद्यातून नशिबाला लागलेले उपेक्षित जीवन जगण्यापेक्षा आत्मसन्मानाने जगण्यासाठी या मुलींनी शिवणकाम हाती घेतले. या मुलांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा एक छोटासा प्रयत्न खुशाल ढाक या तरुणाने केला.
अमिषा लोंढे पाचवा वर्ग शिकलेली. वडील दारू विकतात आणि आई मागायला जाते. घरचे काम करून कधीकधी आईसोबत तीसुद्धा मागायला जात होती. शीतल शेंडे शाळेतच गेली नाही; पण तिला थोडाफार अभ्यास येतो. तीसुद्धा कधीकधी आईबरोबरच कचरा वेचायला गेली आहे. सध्या घरकाम करते आणि आई-वडिलांना त्यांच्या कामात ती मदत करते. रिमा हातागडे हीसुद्धा कचरा वेचायला जायची. अमिषा, रिमा, शीतल यांसारख्या शेकडो मुली या वस्तीमध्ये उपेक्षितांचे जीवन जगत आहे; पण आता काही मुलींच्या हाताला काम मिळाले आहे आणि त्या खूप आनंदी आहेत. खुशालच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे.
खुशाल या वस्तीत बदल घडविण्याचा प्रयत्न करतो. त्याला वस्तीतील मुलींची होत असलेली फरफट लक्षात आली. या मुली घरकाम करून आईवडिलांच्या कामालाही त्या हातभार लावायच्या. कचरा वेचणे, कबाड गोळा करणे, केस गोळा करणे, भीक मागणे... कधीकधी ग्राहकांना दारूही त्यांना विकावी लागायची. १६, १७ वर्षांचे वय झाले की लग्न आणि आयुष्यभर उपेक्षितांचे आयुष्य. या मुलींना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी खुशालने शिवणकाम शिकविण्याचा निर्णय घेतला.
- वस्तीतच सुरू केले केंद्र
एका मुलीच्या पालकांना समजावून तिला शिवणकाम शिकविले. वस्तीतील एका पडक्या खोलीत शिवणकामाचे केंद्र सुरू केले. १६ ते २० वर्षांच्या मुली आवडीने केंद्रात येऊ लागल्या. घरातील कामे आटोपून शिवणकामात त्या स्वत:ला गुंतवू लागल्या. खुशालने त्यांच्याकडून मास्क तयार करायला सुरुवात केली. सध्या त्या शालेय गणवेश शिवण्याचे प्रशिक्षण घेत आहे.
- आत्मविश्वास वाढलाय
आमचे जीवन एका चाकोरीत बांधलेले होते. आमच्या जमातीत मुली जसजशा मोठ्या होतात तसतशी बंधने वाढतात. स्वत:ची जाणीव व्हायच्या पूर्वी लग्नाच्या बंधनात अडकवून पुन्हा बंधने लादली जातात. खुशाल मास्तर आमच्यासाठी झटत आहे. त्यांनी आम्हाला स्वत:ची जाणीव करून दिली आहे. आज वस्तीतील ४० मुली या पडक्या झोपडीत स्वत:बद्दल विचार करू लागल्या आहेत. या कामामुळे आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
- योगिता मानकर
- माझा प्रयत्न आहे की, यांच्या येणाऱ्या पिढ्या या परंपरेच्या जोखडातून मुक्त होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात याव्यात.
खुशाल ढाक, सामाजिक कार्यकर्ता