लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील शासकीय व खासगी रुग्णालयात ७१४४ बेड आरक्षित करण्यात आले आहेत. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या पहिल्या कोरोना लाटेत शहरात १५१४ बेडची व्यवस्था होती. परंतु एप्रिल महिन्यात सप्टेंबरच्या तुलनेत तीनपट अधिक संक्रमित झाले आहेत. भटकंती करूनही रुग्णांना आयसीयू व व्हेंटिलेटर मिळत नाही. असे असतानाही मनपातील सत्तापक्ष आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. १५ हजाराहून अधिक रुग्ण विविध शासकीय व खासगी रुग्णालयात भरती आहेत. ग्रामीणमधील तसेच विदर्भातील रुग्ण उपचारासाठी नागपुरात येत आहेत. शहरातील रुग्णालयावरील भार वाढला आहे. चारपट बेड वाढवूनही रुग्णांना भरती होण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. दुसरीकडे मनपा रुग्णालयात ३०० बेडचीही व्यवस्था नाही. मंगळवारी मोठ्या प्रयत्नानंतर १०० ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले आहे.
मनपाने जारी केलेल्या पत्रकानुसार २८ सप्टेंबर २०२० मध्ये केवळ १५१४ बेड विविध रुग्णालयात उपलब्ध होते. त्यामध्ये ऑक्सिजनचे ११४४, आय.सी.यू.चे ३१६ तर व्हेंटिलेटर सपोर्ट असलेले २३६ बेड उपलब्ध होते. यानंतर प्रत्येक महिन्यात ही संख्या वाढविण्यात आली. ३१ डिसेंबर २०२० रोजी ३९९३ बेड रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आले. त्यात ऑक्सिजनसह २६७३, आय.सी.यू.मध्ये १२०८ तर व्हेंटिलेटर असलेल्या ३४९ बेडचा समावेश होता. ३१ जानेवारी २०२१ रोजी एकूण बेडाची संख्या ३९१० झाली. १८ एप्रिल रोजी ६३८७ बेडची व्यवस्था झाली. महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात मनपाचे प्रयत्न सुरूच आहेत. बेड वाढविण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरूच असल्याचे महापौरांनी सांगितले.
....
नागपुरातील बेडची सद्यस्थिती
खासगी रुग्णालय - १४१
कोविड रुग्णांसाठी बेड - ४४८४
ऑक्सिजन बेड - २६८४
आई.सी.यू. - १६१२
व्हेंटिलेटर्स बेड - ३२०
शासकीय रुग्णालय -१२
कोविड रुग्णांसाठी बेड -२६६०
ऑक्सिजन बेड - १९६९
आई.सी.यू. बेड - ५०१
व्हेंटिलेटर्स बेड - २२२