लाेकमत न्यूज नेटवर्क
केळवद : स्थानिक मटन, चिकन मार्केट बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करीत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत अप्पर आयुक्त संजय धिवरे यांनी केळवदच्या सरपंच गीतांजली वानखेडे यांना सरपंचपदासाठी अपात्र ठरविले आहे.
केळवद ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक ऑक्टाेबर २०१७ मध्ये पार पडली. यात गीतांजली वानखेडे, सुधाकर बांद्रे, अशाेक साेनेकर, वर्षा काटेकर, माधुरी नगराळे, सुवर्णा ताजने, कांता चाैबे, गीतांजली साैदागर व बी. टी. बांबल आदी सदस्य म्हणून निवडून आले हाेते. गीतांजली वानखेडे यांची पुढे सरपंचपदासाठी निवड करण्यात आली. या सर्व सदस्यांनी गावातील मटन मार्केटच्या बांधकामासाठी १६ डिसेंबर २०१७ राेजी ग्रामपंचायतच्या मासिक सभेत ठराव पारित केला.
या बांधकामात भ्रष्टाचार करण्यात आल्याची तक्रार सुनील कामडी यांनी प्राधिकरणाकडे केली हाेती. या भ्रष्टाचाराला सरपंचासह आठ ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक दाेषी असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले हाेते. त्या अनुषंगाने या प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांच्या आदेशान्वये चाैकशी करण्यात आली.
दरम्यान, सरपंच गीतांजली वानखेडे यांच्यासह आठ सदस्य व ग्रामसेवकाचे बयान नाेंदविण्यात आले. यात सरपंच, आठ ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक दाेषी असल्याचे स्पष्ट झाले. अप्पर आयुक्त संजय धिवरे यांनी या प्रकरणाचा मंगळवारी (दि. १७) निवाडा दिला. यात सरपंच गीतांजली वानखेडे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये सरपंचपदासाठी अपात्र ठरविण्यात आले.
...
१.२ लाखाचे निर्माणकार्य
या बांधकामासाठी १ लाख २ हजार ५७१ रुपयाचा निधी प्रस्तावित केला हाेता. वास्तवात बांधकाम करताना त्यात भंगार साहित्य वापरणे, दवंडी न देता दवंडीचे खाेटे दस्तऐवज तयार करणे, निविदा प्रक्रिया याेग्य पद्धतीने न राबविणे, अंदाजपत्रकाच्या कक्षेबाहेर बांधकाम करणे यासह अन्य महत्त्वाच्या बाबी चाैकशीत स्पष्ट झाल्या आहेत. विशेष म्हणजे, सरपंचासह अन्य सदस्यांनी त्यांच्यावरील आराेप बयानादरम्यान नाकारले हाेते.