नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशासमोरील विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर लक्ष वेधत असताना समाजातील विकृती व कुसंस्कारांवरदेखील भाष्य केले. विशेषतः ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कंटेटवर त्यांनी चिंता व्यक्त केली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण आवश्यक असून, त्याबाबत कायदा करायला हवा, असे ते म्हणाले.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर बीभत्सतेचे प्रदर्शन होते. त्याच्याबाबत कायदे हवेत, त्यानेच नियंत्रण येईल. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे. अनेक भागांमध्ये तरुणाईकडून अमलीपदार्थांच्या सेवनाच्या घटना वाढत आहेत. हा प्रकार गंभीर आहे, असे ते म्हणाले. आपण जगाचे अंधानुकरण केले व पर्यावरणाच्या विविध समस्या निर्माण झाल्या. आपल्या जैविक शेतीसारख्या पद्धतींचा जीवनप्रणालीत समावेश करावा लागेल. पाणी वाचविण्यावर भर दिला पाहिजे. तसेच सिंगल यूझ प्लॅस्टिकचा वापर बंद करायला हवा, असेही ते म्हणाले.