सुमेध वाघमारे/विशाल महाकाळकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वादिष्ट, लज्जतदार व्यंजनांच्या शौकिनांना आता सतर्क होण्याची वेळ आली आहे; कारण
‘लोकमत’ चमूने ‘आॅन द स्पॉट’मधून हे पदार्थ जिथे तयार होतात त्या परिसराला भेट दिली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. जिथे नाकाला रुमाल बांधूनही उभे राहणे अशक्य आहे, अशा अस्वच्छ वातावरणात हे पदार्थ तयार होत असल्याचे दिसून आले. विशेषत: मोतीबाग रेल्वे लाईनच्या झोपडपट्टीत तुंबलेल्या नाल्याशेजारी उघड्यावर पाणीपुरीचे पीठ मळण्यापासून ते तळतानाचे चित्र होते. अशाच घाणीत विविध ठिकाणी इतरही खाद्यपदार्थ तयार होत असल्याचे आढळून आले.मोतीबाग रेल्वे लाईन या वसाहतीतून मोठा नाला गेला आहे. या नाल्यालगतच ही वसाहत वसलेली आहे. पावसामुळे या भागात जागोजागी घाण साचलेली आहे. यात कचºयाचा ढीग, त्याची दुर्गंधी व घोंगावणाºया माशांमध्ये पाणीपुरी तयार होते. विशेषत: येथे प्यायला स्वच्छ पाणी नाही, तिथे पाणीपुरी तयार करण्यासाठी मिळेल त्या पाण्याचा वापर केला जातो. पुरी तयार करण्यासाठी काही जण मैदा अक्षरक्ष: पायाने तुडवताना दिसून आले. या वेळी अंगावर फक्त हाफपँट किंवा लुंगी होती. त्यांच्या अंगावरची घाणही यात मिसळत होती. मळलेल्या मैद्यातून छोटे-छोटे गोळे करीत एका मोठ्या सपाट काळ्याकुट्ट लाकडी पाट्यावर लाटल्या जातात. त्यानंतर कळकट तेलातून पुरी तळून काढली जाते. तळलेल्या पुऱ्यांचाजमिनीवर ढीग लावून त्याचे पॅकिंग केले जाते.