नागपूर : समोर दिसणाऱ्या प्रसंगाकडे संवेदनशीलतेने पाहत तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचे माध्यम म्हणजे फोटोग्राफी. त्यामुळे या क्षेत्रात स्व:तचे नाव कमवायचे असेल तर संवेदनशीलता, कल्पकता आणि संयम ही त्रिसुत्री बाळगणे गरजेचे आहे. हे गुण नसतील तर प्रकाश किरणांच्या या कलेत स्वत:चे स्थान निर्माण करता येऊ शकणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार अरविंद पुरंदरे यांनी केले.धरमपेठ कॉमर्स कॉलेजमध्ये राजू पोटे स्मृतिप्रीत्यर्थ सुरू असलेल्या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन, रोटरी क्लब आॅफ नागपूर आॅरेंजसिटी, आरएस मुंडले धरमपेठ आर्टस अॅँड कॉमर्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप चॅटर्जी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजच्या प्राचार्य डॉ. संध्या नायर, भाजपाचे देवेंद्र दस्तुरे उपस्थित होते. कार्यशाळेत छायाचित्रणाच्या क्षेत्रात आवड असणाऱ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले. पुरंदरे म्हणाले, फोटोग्राफी ही नुसती कला नाही. एकाच वेळी स्वत:शी आणि जगाशी साधलेला दुहेरी संवाद आहे. कोणताही क्षण कॅमेरात बंदिस्त करण्यापूर्वी प्रत्येकाने हातातल्या कॅमेऱ्याचा स्वभाव आणि त्याच्यातले बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. जे दिसते ते टिपणे हे कॅमेराचे काम आहे. मात्र त्याला योग्य दिशा देणे हे आपले काम आहे. आवश्यक तितक्याच प्रकाश किरणांचे बोट धरून समोरचा क्षण टिपणे ही कला आहे. स्वत:च्या फोटोवर तटस्थपणे टीका कराल तरच झालेल्या चुकांमधून बोध घेता येईल. सध्याच्या डिजिटलायझेशनने हे तंत्र आणखीनच सुलभ केले आहे. प्रकाशाच्या छटांची एकदा माहिती झाली की कोणत्या वेळी शटर स्पिड किती ठेवायची, अॅपर्चर किती असावा, डेप्त आॅफ फिल्ड कशी मेन्टेन करायची, फोकस कुठे हवा, आयएसओ किती हवा या गोष्टी आत्मसात होतील. या कलेच्या क्षेत्रात कोणीही अभिमन्यू नाही. त्यामुळे चुका होतील ही भीती दूर करा आणि आपल्याच चुकांमधून हे तंत्र अवगत करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. विवेक रानडे यांनी फोटो क्लिक करून कार्यशाळेचे उद्घाटन केले. त्यांनी फोटोग्राफीच्या क्षेत्रात व्हिजन, क्रिएटिव्हीटी, संवेदनशीलतेची जोड हवी असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नाझनिन हीने केले. (प्रतिनिधी)
फोटोग्राफीसाठी हवी संवेदनशीलता, कल्पकता अन् संयम
By admin | Published: October 30, 2014 12:45 AM