प्रदीप घुमडवार
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : पिकांना देण्यासाठी शेतकरी सध्या युरिया खरेदी करीत आहेत. मात्र, कुही तालुक्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्र संचालक शेतकऱ्यांना केवळ युरिया विकत द्यायला तयार नाहीत. युरियासाेबत इतर रासायनिक खते खरेदी केल्यास युरिया मिळेल, असे आडमुठे धाेरण त्यांनी स्वीकारल्याने शेतकऱ्यांची विवंचना वाढली आहे.
कृषी निविष्ठांच्या किमती, मजुरीचे दर वाढल्याने तसेच शेतमालाला बाजारात उत्पादन खर्चाच्या तुलनेत बराच कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. नैसर्गिक संकटांमुळे शेतमालाचे हाेणारे नुकसान वेगळेच आहे. अलीकडच्या काळात शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापरही अनिवार्य झाला आहे. त्यातच युरिया वगळता अन्य खतांच्या किमती वाढल्या आहेत.
काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून तर काहींनी उसनवार करून पेरणी केली. तालुक्यात धानाचे पीक घेतले जात असून, सध्या धानाच्या पिकाचा वाढीचा काळ असल्याने याला नत्राची नितांत आवश्यकता आहे. पिकाची ही गरज पूर्ण करण्यासाठी शेतकरी युरियाचा वापर करतात. बहुतांश शेतकरी युरिया खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात गेले असता, दुकानदारांनी त्यांना केवळ युरिया देण्यास नकार दिला आहे. युरिया हवा असल्यास दुसरी खते खरेदी करावी लागणार असल्याच्या सूचनाही दुकानदारांनी शेतकऱ्यांना केल्या आहेत.
...
दुसऱ्या खताचे करायचे काय?
युरियाच्या तुलनेत इतर मिश्र व संयुक्त खतांच्या किमती किमान दुप्पट व तिप्पट आहेत. युरियासाेबत इतर खते खरेदी केली तर ती खते गरज नसताना काेणत्या पिकाला द्यायची, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. शिवाय, त्या खतांच्या किमती अधिक असल्याने खरेदी करण्यासाठी एवढा पैसा आणायचा कठून, ही खते विनाकारण घरी साठवून ठेवायची काय, असाही प्रश्न काहींनी उपस्थित केला.
...
युरियाचा तुटवडा
कुही तालुक्यातील ठरावीक कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया विक्रीसाठी उपलब्ध आहे. बहुतांश दुकानांमध्ये युरिया नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे काही दुकानदारांनी खासगीत सांगितले. काहींनी तर तालुक्यात युरियाचा तुटवडा असल्याचेही सांगितले. हा गंभीर प्रकार माहिती असूनही स्वत:ला नेते समजणारे शेतकरी यावर काहीही बाेलायला व स्थानिक लाेकप्रतिनिधी काही करायला तयार नाहीत.
...
तालुक्यात आवश्यकतेनुसार युरियाची मागणी केली व उपलब्ध करून दिला. युरियाची किंमत कमी असल्याने शेतकरी अधिक वापर करताे. त्यामुळे युरियाचा तुटवडा निर्माण हाेताे. यावर पर्याय म्हणून शासनाने लिक्विड युरिया उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांनी पिकावर लिक्विड युरियाची फवारणी करावी. त्यामुळे पिकाची नत्राची गरज पूर्ण हाेईल.
- प्रदीप पोटदुखे,
तालुका कृषी अधिकारी, कुही
...
कंपनीकडे युरियाची मागणी केली असता, कंपनी आपल्याला युरियासाेबत इतर खते खरेदी करण्यास भाग पाडते. गरज नसताना ती खते खरेदी करावी लागतात व पैसे कंपनीकडे जमा करावे लागतात. यात माेठी रक्कम गुंतवावी लागत असल्याने नाइलाजाने काही दुकानदार युरियासाेबत इतर खते विकत घेण्याची सूचना करतात. हा प्रकार प्रशासनाला माहिती आहे. त्यामुळे युरियाची टंचाई जाणवते.
- प्रदीप कुलरकर,
कृषी सेवा केंद्र मालक, मांढळ
...
शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या तुटवड्याला नेहमीच सामाेरे जावे लागते. यातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट हाेते. शासनाने याेग्य नियाेजन करून शेतकऱ्यांना आवश्यक कृषी निविष्ठा वेळेवर उपलब्ध करून द्यायला पाहिजे.
- प्रमोद घरडे,
शेतकरी, साळवा, ता. कुही
...