नागपूर : करिअरमुळे लग्न व मूल लांबणीवर टाकले जात असल्याने वंध्यत्वाचे प्रमाण वाढले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांवर आले आहे. यासह इतरही कारणांसाठी मागील दोन वर्षांत नागपुरात स्त्रीबीज गोठविणाऱ्यांची (एग्ज फ्रीजिंग) संख्या वाढली आहे. वर्षाकाठी जवळपास १० ते १५ महिला ‘एग्ज फ्रीजिंग’ करीत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात तरुणींची संख्या जवळपास ६० टक्के आहे.
निसर्गाच्या नियमानुसार आई होण्याचे वय २१ ते ३० आहे. परंतु करिअरला प्राधान्य देऊन लग्न उशिरा करणे किंवा लग्नानंतरसुद्धा करिअर, इतर जबाबदाऱ्या, अडचणी असल्यामुळे बरेच वर्ष कुटुंबनियोजन करीत मूल होऊ न देण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. महिलांचे जसे जसे वय वाढत जाते तसतसे आई होण्याची क्षमता कमी होत जाते. निसर्गाचे नियमच आपण पाळत नसल्याने वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. या शिवाय ज्या महिलांना गर्भाशयाशी संबंधित समस्या आहेत, लवकर ‘मेनोपाज’ होण्याची हिस्ट्री किंवा काही कारणे आहेत त्या महिला किंवा तरुणी ‘एग्ज फ्रीजिंग’ची प्रक्रियेचा वापर करीत आहे.
असे केले जाते स्त्रीबीज फ्रीजिंग
गर्भ पिशवीची सोनोग्राफीद्वारे प्राथमिक तपासणी करीत अंड्याच्या गुणवत्तेचा अंदाज घेतला जातो. इंजेक्शन देऊन अंडाशयात बीजांना तयार केले जाते. सोनोग्राफीच्या मदतीने बीज काढून लॅबमध्ये त्यावर प्रक्रिया होते. यात द्रवरूपातील नायट्रोजनचा वापर करून अंडी दुप्पट वेगाने थंड करतात. त्यानंतर, बीज फ्रीजिंग प्रक्रियेत जतन राहण्यासाठी तयार होते. स्त्रीबीज हवे तितके वर्ष सुरक्षित ठेवता येते.
बीज फ्रीजसाठी २० ते ३० वयोगट प्रभावी
स्त्रीरोग तज्ज्ञानुसार, स्त्रीबीज फ्रीजिंगसाठी २० ते ३० वयोगट प्रभावी असतो. जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणेचा निर्णय घेते तेव्हा ही गोठवलेली अंडी उबदार करून, शुक्राणूंच्या साहाय्याने लॅबमध्ये गर्भ तयार केला जातो. त्यावर प्रक्रिया करून ती गर्भाशयात सोडली जातात.
- धोकेही आहेत
गर्भाशयाला प्रजननतेसाठी प्रवृत्त करण्यासाठी देणाऱ्या इंजेक्शनमुळे काही प्रकरणांमध्ये अंडाशयात पाण्याच्या गाठी येण्याची शक्यता असते. बिजांडाच्या पुनर्प्राप्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीक्ष्ण सुईमुळे जखमा होण्याचा धोकाही असतो.
-‘एग्ज फ्रीजिंग’ हा शेवटचा पर्याय असावा
योग्य वयात लग्न व मूल होणे आवश्यक आहे. ‘एग्ज फ्रीजिंग’मुळे उशिरा मूल होणे शक्य असले तरी आईचे वाढलेले वय गर्भधारणेसाठी साथ देत नाही. या वयात मधुमेह, उच्चरक्तदाबासारख्या समस्या वाढलेल्या असतात. करिअर करणाऱ्या वयातही मातृत्वाचीही जबाबदारी पेलणे सहज शक्य आहे. ‘एग्ज फ्रीजिंग’ हा भविष्यातील प्रजनन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी मार्ग असलातरी तो शेवटचा पर्याय असावा. नागपुरात मागील दोन वर्षात याचे प्रमाण वाढले आहे.
- डॉ. चैतन्य शेंबेकर, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ