नागपूर : विदर्भातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या विदर्भ अॅग्रिकल्चरल अॅण्ड अलाईड प्रोड्युसर कंपनी लिमिटेड (वॅपको) या कंपनीला महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत २०२१-२२ या हंगामापासून खरेदीसाठी राज्य नोडल संस्था म्हणून नियुक्त केले आहे. या संदर्भात १५ सप्टेंबरला पणन सचिव अनुपकुमार यांच्या दालनात खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये आधारभूत किमतीवर कडधान्य व तेलबिया खरेदीबाबत बैठक झाली.
आतापर्यंत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व विदर्भ सहकारी पणन महासंघ या दोन प्रमुख संस्थांतर्फे कडधान्य व तेलबिया खरेदी केल्या जात होत्या. विदर्भातील एकूण क्षेत्राचा आवाका बघता व शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी गाव पातळीवर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या जाळ्यातून ही खरेदी करण्याचा महाराष्ट्र शासनाचा भर आहे. या हंगामापासून वॅपको कंपनीला हे काम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. वॅपको कंपनीशी संलग्न शेतकरी उत्पादक कंपन्या व इतर इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्वरित संपर्क करून २५ सप्टेंबरच्या आत खरेदी केंद्राची मागणी करावी, असे आवाहन वॅपकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय उरकुडे यांनी केले आहे.
वॅपको मागील तीन वर्षांपासून विदर्भात कार्यरत असून संस्थेशी विदर्भातील १७५ च्यावर शेतकरी उत्पादक कंपन्या जुळलेल्या आहेत. संस्था विदर्भातील प्रमुख पिकांच्या कृषी मूल्य साखळी जसे भात, कडधान्य, तेलबिया, संत्रा, भाजीपाला, गौण वन उपजवर काम करीत आहे.