नागपूर मनपा निवडणूक : भाजपची पुन्हा स्वारी की यंदा काँग्रेस गड भेदणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 11:03 AM2022-02-19T11:03:52+5:302022-02-19T11:12:34+5:30
भाजप आपले वर्चस्व कायम राखणार की काँग्रेस २००२च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे. प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल झ्राले आहेत. मागील पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अशा परिस्थितीत भाजप आपले वर्चस्व कायम राखणार की काँग्रेस २००२च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
२००२मध्ये मनपा निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली होती. यात काँग्रेसची सत्ता आली होती. २०१७च्या निवडणुकीत १५१पैकी तब्बल १०८ जागांवर भाजपने बाजी मारून एकहाती सत्ता मिळवली होती. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर नागपुरात भाजपने मुसंडी मारली होती. दक्षिण व पूर्व नागपुरातही काही प्रमाणात अशीच परिस्थिती होती. दक्षिण-पश्चिम नागपुरातही काँग्रेसच्या जागा कमी झाल्या होत्या. मात्र, चार सदस्यीय प्रभागामुळे मागील पाच वर्षात बहुसंख्य नगरसेवकांचा नागरिकांशी संपर्क नव्हता. काही नगरसेवकांचा चेहराही नागरिकांनी बघितलेला नाही. यामुळे नगरसेवकांविषयी रोष आहे. याचा फटका विद्यमान नगरसेवकांना निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपने १२० जागांचा संकल्प केला आहे. दुसरीकडे २००२च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.
२०१२च्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. मात्र, भाजपला सर्वाधिक ६२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ४१ जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपने अपक्ष, बरिएम, रिपाइं (आठवले), मुस्लिम लीग यांच्या पाठिंब्यावर मनपातील सत्ता काबीज केली होती.
२०१२मध्ये अपक्षांची भूमिका ठरली निर्णायक
२०१२मध्ये मनपाची निवडणूक दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली होती. या निवडणुकीत १४५पैकी भाजपचे ६२ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेना ६ तर अपक्ष, बरिएम, रिपाइं यांच्या १६ नगरसेवकांच्या पाठिंब्याने भाजपने सत्ता मिळवली होती. काँग्रेसचे ४१, राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ व बसपाचे १२ नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीत अपक्षांची भूमिका निर्णायक ठरली होती.
२०१२मधील संख्याबळ
भाजप - ६२
काँग्रेस - ४१
बसपा - १२
राष्ट्रवादी काॅंग्रेस - ६
शिवसेना - ६
मनसे - २
अपक्ष व छोटे पक्ष - १६
२०१७मधील संख्याबळ
भाजप - १०८
काँग्रेस - २९
बसपा - १०
शिवसेना - २
राष्ट्रवादी काँग्रेस - १
अपक्ष - १