लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनावर उपयोगी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा वॉर्डबॉय शेख आरीफ शेख रफिक (२२) याला सत्र न्यायालयाने सोमवारी भादंविच्या कलम ३८१ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली.
याशिवाय आरोपीला भादंविच्या कलम ४२०अंतर्गत २ वर्षे, तर जीवनावश्यक वस्तू कायद्यातील कलम ७ व औषधे कायद्यातील कलम २७ (ड) अंतर्गत प्रत्येकी १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, पहिल्या दोन कलमांखाली प्रत्येकी ५००० रुपये, तर तिसऱ्या कलमाखाली २० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. हा दंड न भरल्यास आरोपीला प्रत्येक दंडासाठी ६ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. आरोपी २४ एप्रिल २०२१पासून कारागृहात असून, त्याला कारावासाच्या सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. घुगे यांनी हा निर्णय दिला. आरोपी तेलीपुरा, शांतीनगर येथील रहिवासी असून, तो होप हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय होता. सरकारने आरोपीविरूद्ध १३ साक्षीदार तपासले. सरकारच्या वतीने ॲड. ज्योती वजानी यांनी कामकाज पाहिले.
...अशी उघड झाली चोरी
शेख आरीफ हा होप हॉस्पिटलमधील फार्मसीतील रेमडेसिविर व इतर महत्त्वाची इंजेक्शन चोरून कोरोना रुग्ण व संबंधितांना विकत होता. हॉस्पिटल प्रशासनाला कोरोनावरील इंजेक्शन्सचा साठा कमी आढळायला लागल्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. त्यानुसार २३ एप्रिल २०२१ रोजी आरोपीची बॅग तपासण्यात आल्यानंतर त्यात दाेन रेमडेसिविर, चार पेंटॅप्राझोल, तर प्रत्येकी एक मेरोपेनीम, पेप्रोसेलीन व सुसीनेक्स इंजेक्शन आढळून आले. त्यामुळे आरोपीविरूद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.
दहा दिवसात दुसरी शिक्षा
रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणामध्ये दहा दिवसातील ही दुसरी शिक्षा होय. यापूर्वी गेल्या २३ जुलै रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने वॉर्डबॉय महेंद्र रतनलाल रंगारी (२८) याला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली होती. दिघोरी नाका, हुडकेश्वर येथील रहिवासी असलेला हा आरोपी क्रीडा चौकातील ओजस कोविड सेंटरमध्ये कार्यरत होता.