प्रशासनाला पुरविली चुकीची माहिती: नव्याने आरक्षण सोडतीची मागणी
हिंगणा : हिंगणा नगर पंचायतचे आरक्षण काढताना प्रभाग रचनेत बदल करण्यात आला. मागील पंचवार्षिक निवडणुकीतील आरक्षणाची चुकीची माहिती प्रशासनाला नगर पंचायतीने पुरवली. यामुळे आरक्षण सोडत काढताना अन्याय करण्यात आला. याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे हरकतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जुनी प्रभाग रचना कायम ठेवून नव्याने आरक्षण सोडत काढावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंगणा नगर पंचायत मध्ये १७ वाॅर्ड आहेत. प्रभाग रचना २०१५ चे आरक्षण रद्द करून २०२० मध्ये बदल करण्यात आला. तसेच वाॅर्ड क्रमांक ७, ११ व १७ मध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीत महिलाचे आरक्षण होते अशी चुकीची माहिती जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आली. यामुळे आरक्षण काढताना यावेळी या ठिकाणी अन्याय झाला आहे. याबाबतची तक्रार हरकतीच्याद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिष पुंड व प्रवीण घोडे यांनी केली आहे. या तक्रारीत प्रभाग रचनेत बदल करण्यामागचा हेतू काय, प्रभाग रचना बदलल्यामुळे आता वॉर्डातील नागरिकांना आधार कार्ड सुद्धा भविष्यात बदलावे लागतील,यामुळे प्रभाग रचनेत बदल करून एक प्रकारे सर्वसामान्य जनतेवरही अन्याय झाला आहे. त्यामुळे नव्याने करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करावी, जुनीच प्रभागरचना कायम ठेवून नव्याने आरक्षणाची सोडत काढण्यात यावी, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे. या हरकतीवर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत ९ डिसेंबर रोजी सुनावणी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी ठाकरे यांच्यासह मुख्याधिकारी राहुल परिहार, आशिष पुंड व प्रवीण घोडे उपस्थित होते.