लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - घरगुती कारणावरून त्याने स्वत:चे अपहरण झाल्याचा कांगावा केला. मात्र, पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्याची बनवाबनवी उघड करून त्याने खोटी तक्रार केल्याची कबुली त्याच्याकडून वदवून घेतली. सचिन नामदेव पडोळे (वय ३१) असे त्याचे नाव आहे.
सचिन एका ईस्पितळात वाॅर्ड बॉय आहे. त्याची पत्नी परिचारिका आहे. पाच वर्षांपूर्वी कुटुंबाचा विरोध झुगारून या दोघांनी प्रेमविवाह केला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांनी त्यांच्याशी संबंध तोडले. दरम्यान, या दोघांमधील कुरुबुरी आता वाढल्या. नातेवाईकांचा आधार नसल्याने सचिन एकाकी पडला आहे. घरगुती दडपणामुळे तो २१ जुलैला घरून निघून गेला. तो बेपत्ता झाल्यामुळे पत्नीने तशी अंबाझरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोधाशोध केली. दरम्यान, रविवारी दुपारी त्याचा पत्नीला फोन आला. आपले अपहरण झाले होते, असे तो म्हणाला. सध्या बाजारगावजवळच्या व्याहाडपेठ पोलीस चाैकीत असून, लवकरच नागपूरला येत असल्याचे त्याने सांगितले. व्याहाडपेठ पोलिसांनी त्याची अपहरणाची तक्रार ऐकून त्याला हिंगणा ठाण्यात पोहचवले. प्रकरण अंबाझरी पोलिसांच्या हद्दीतील असल्यामुळे हिंगणा पोलिसांनी त्याला अंबाझरी ठाण्यात आणले.
----
आधीची बनवाबनवी
तुमचे पार्सल आले आहे, असे सांगून एकाने आपल्याला अमरावती मार्गावर बोलविले. एका आयशर ट्रकजवळ तीन ते चार जणांनी अंगावर पोते टाकून वाहनात बसवले. नंतर अज्ञातस्थळी नेले. तेथे एका रुममंध्ये डांबून ठेवत आपल्याला मारहाण केली. जवळचा मोबाईल आणि १६०० रुपये हिसकावून घेतले, संधी मिळाल्याने आपण सुटका करून रविवारी पळ काढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
---
अन् तो गडबडला
पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याची चाैकशी सुरू केली. मात्र, त्याच्या बयानात वारंवार विसंगती येत असल्याने पोलिसांना त्याचाच संशय आला. त्यामुळे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे सचिन गडबडला. त्याने घरगुती दडपणामुळे अपहरणाचा कांगावा केल्याची कबुली दिली. पाच दिवस आपण आपल्या उमरेडच्या मित्रांकडे थांबलो होतो. छान पाहुणचार झोडला अन् कोंढाळीकडे परत जाताना पत्नीला फोन केल्याची कबुली त्याने दिली.
----