नागपूर :वर्धा - बल्लारशाह या रेल्वे मार्गाच्या थर्ड लाईनचे काम वेगात सुरू आहे. १३२.३४ किलोमिटर लांबीच्या या लोहमार्गाचे आतापावेतो ३३.३३ किलोमिटरचे काम पूर्ण झाले असून ही रेल्वे लाईन पूर्ण झाल्यानंतर मुंबई-हावडा या अत्यंत व्यस्त रेल्वे मार्गावरील ट्रेन्सची गर्दी कमी होईल आणि गाड्यांच्या रेंगाळण्याचे प्रमाणही कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
रेल्वेच्या या प्रकल्पाला एकूण १३८४.७२ कोटींचा खर्च येणार आहे. त्यानुसार आजपर्यंत ८०६.२८ कोटी रुपये खर्च झाले असून त्यातून वर्धा ते हिंगणघाटपर्यंतचा लोहमार्ग तसेच अन्य कामे पूर्ण करण्यात आली आहे. तर, ४७.९८ किलोमिटरचे काम वेगात सुरू आहे. प्रगतीपथावर असलेल्या या प्रकल्पात हिंगणघाटपासून चिकणी रोडपर्यंतच्या २८.६५ किलोमिटर, माजरी ते तडाली (१९.३३ किलोमिटर), चिकणी रोड ते माजरी (२२.५० किलोमिटर) आणि तडाली ते बल्लारशाह (२८.५३ किलोमिटर) या कामांचा समावेश आहे.
रेल्वे ओव्हर रेल ब्रिज
वर्धा ते सेवाग्राममध्ये आणि माजरी व तडाली येथील रेल्वे ओव्हर ब्रीजचे कामही प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकल्पासाठी १३६.४४ किलोमिटर जमिनीची गरज असून त्यापैकी आतापावेतो १२५.५२ हेक्टर अर्थात ९२ टक्के जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.