नागपूर: ११७८ कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेल्या वर्धा आणि नागपूरदरम्यानच्या रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचे काम वेगात सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर वर्धा, नागपूरमार्गे देशाच्या विविध महानगरात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचा वेगही वाढेल, अशी अपेक्षा आहे.
७८.७० किलोमीटर लांबीचे हे काम असून, त्यातील थर्ड लाइनचे ७२ टक्के, तर फोर्थ लाइनचे ७० टक्के काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यासाठी आतापावेतो १०३५.९२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यात अर्थवर्क ६९ टक्के झाले असून, या मार्गावर दोन पूल बांधण्यात आले आहेत.
स्टेशनच्या इमारतीचे काम २८ टक्के पूर्ण झाले असून, नवीन सिग्नलिंग इलेक्ट्रॉनिक ओव्हरलॉकिंग, सिग्नलिंग इनडोअर आणि आउटडोअर कामेही केली जात आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वर्धा आणि नागपूरमार्गे पुणे, मुंबई तसेच अन्य महानगरात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचा वेग वाढण्यास मदत होईल. परिणामी कमी वेळेत प्रवाशांना त्यांचा प्रवास पूर्ण करता येणार आहे.