नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्याच्या भरभराटीचा मार्ग प्रशस्त करू पाहणाऱ्या वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गाचे १५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. आज त्यासंबंधाची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली असून, या प्रकल्पाच्या कामाचा वेग लक्षात घेता पुढच्या दोन महिन्यांत देवळी ते कळंब रेल्वे स्थानकादरम्यानचे कामही पूर्ण होण्याची शक्यता आहे.
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गाचे काम तातडीने पूर्ण व्हावे म्हणून डॉ. विजय दर्डा सातत्याने प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ते सतत संपर्कात असतात. या पार्श्वभूमीवर, सरकारने या प्रकल्पाच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तसेच कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जाता यावा यासाठी एक विशेष कक्ष निर्माण केला आहे.
राज्याचे मुख्य सचिव मनोज साैनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, तसेच उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यावर लक्ष ठेवून असतात. डॉ. दर्डा यांचीही त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा होते. त्यामुळे या बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्पाची गाडी आता चांगलीच गतिमान झाली आहे.
प्रकल्पाचा आढावा
एकूण लांबी - २८४.६५ किमी
पूर्ण झालेल्या कामाची लांबी- १५ किमी
एकूण किंमत- ३४४५. ४८ कोटी
आजपर्यंतचा खर्च- १८१६.२८ कोटी (५२ टक्के)
झपाट्याने सुरू आहे काम
वर्धा - देवळी रेल्वे स्थानकादरम्यानचा १५ किलोमीटरचा टप्पा, तर देवळी - कळंब रेल्वेस्थानकादरम्यानचा २३.६१ किमीचा टप्पा पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, या टप्प्यातील कामाची प्रगती बघता यावर्षीच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता रेल्वे अधिकारी व्यक्त करीत आहेत, तर, पुढच्या २४६ किलोमीटरच्या टप्प्यातील कळंब नांदेडपर्यंतचे कामही झपाट्याने सुरू आहे.