लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : वीज केंद्रातील राख (फ्लाय ॲश) साठविण्यात येणाऱ्या वारेगाव शिवारातील ॲश बंडला मंगळवारी (दि. २१) दुपारी दाेनदा भगदाड पडले. त्यामुळे राखमिश्रित पाणी काेलार नदीत शिरल्याने नदीतील पाणी दूषित हाेण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे, या ॲश बंडच्या बांधाला वारंवार भगदाड पडत असल्याने या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खापरखेडा वीज केंद्रातील राख साठवून ठेवण्यासाठी वारेगाव (ता. कामठी) शिवारात ॲश बंडची निर्मिती करण्यात आली. तीन वर्षापूर्वी या ॲश बंडची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, या कामाचे कंत्राट अभि इंजिनिअरिंग नामक कंपनीला दिले आहे. तेव्हापासून या ॲश बंडला भगदाड पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
खापरखेडा वीज केंद्रातील राख पाण्यात मिसळवून पाईपलाईनद्वारे या ॲश बंडमध्ये साेडली जाते. याच ठिकाणी ही राख साठवून ठेवली जाते. हा ॲश बंड वारंवार फुटत असल्याने, कामठी तालुक्यातील कवठा व वारेगाव येथील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. परंतु, महाजेनकाे प्रशासनाने एकाही तक्रारीची साधी दखल घेतली नाही. दुसरीकडे, निकृष्ट कामामुळे वारंवार भगदाड पडत असल्याने त्याच्या दुरुस्तीचा व देखभालीचा भुर्दंडही महाजेनकाेलाच सहन करावा लागत आहे.
मंगळवारी काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे भिंतीला तडे गेले आणि हा ॲश बंड फुटल्याचा दावा महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या भिंतींच्या भेगा बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या परिसरात बाहेरची व्यक्ती जाणार नाही, यासाठी सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
यासंदर्भात आपल्याला काहीही माहिती नसल्याचे कंत्राटदार अभि इंजिनिअरिंग कंपनीचे एक्झिक्युटिव्ह शिंदे यांनी सुरुवातीला सांगितले. नंतर पावसामुळे ॲश बंड ओव्हरलाेड झाला आणि त्याला भगदाड पडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात वीज केंद्रातील राख नांद शिवारात साठविण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
...
वर्षभरातील चाैथी घटना
या ॲश बंडला मंगळवारी दुपारी दाेनदा तर पाेळ्याच्या दुसऱ्या दिवशी एकदा असे पंधरवड्यात तीनदा भगदाड पडले. यापूर्वीही याच्या भिंतीला भगदाड पडल्याने वर्षभरात हा ॲश बंड चारदा फुटला आहे. या ॲश बंडच्या भिंतींची उंची वाढविण्याचे काम महाजेनकाेच्या सिव्हील विभागाच्या देखरेखीखाली केले जात असून, याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही महाजेनकाेचीच आहे. हा ॲश बंड वारंवार फुटत असतानाही याची साधी चाैकशी करण्याचे व कंत्राटदारावर कारवाई करण्याचे धाडसही महाजेनकाेने दाखविले नाही.
...
शेतकऱ्यांचे नुकसान
महाजेनकाेने या राखेच्या देखभालीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. मात्र, कुणीही लक्ष द्यायला तयार नाही, असा आराेप कवठा व वारेगाव येथील शेतकऱ्यांनी केला आहे. सन २०१९ मध्ये हा ॲश बंड तीनदा फुटला हाेता. त्यावेळी राखमिश्रित पाणी परिसरातील शेतात माेठ्या प्रमाणात साचल्याने शेतातील संपूर्ण पीक खराब झाले हाेते. त्यामुळे वारेगाव व कवठा येथील शेतकऱ्यांना माेठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले हाेते. ही समस्या गंभीर रूप धारण करीत असून, महाजेनकाे प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे.
...