अनिल सोले यांच्या पुढाकाराने बैठक : जिल्हाधिकाऱ्यांकडून आश्वासननागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय गोदामांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, कामगारांना न्याय मिळणार आहे. आ. अनिल सोले यांनी गोदाम कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. तीत सर्व प्रश्न मांडण्यात आले. चर्चेअंती जिल्हाधिकाऱ्यांनी गोदामात व्यवस्था करणे, कामगारांना पदोन्नती देणे, महागाई भत्ता मंजूर करणे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, फूड अॅण्ड अलाईट लोडिंग अनलोडिंग मजदूर युनियनचे सचिव हिरालाल बेले, युनियन प्रतिनिधी विनोद धोतरे आदी उपस्थित होते. आ. अनिल सोले यांनी अजब बंगल्याच्या शेजारी असलेल्या शासकीय गोदामाची भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी गोदामात मोठ्या प्रमाणात अव्यवस्था आढळून आली होती. एवढेच नव्हे तर कर्मचारी व कामगारांनीही त्यांचे प्रश्न मांडले होते. या प्रश्नांची दखल घेत सोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावली. बैठकीत युनियनचे सचिव बेले यांनी सांगितले की, गोदामात धान्य साठविण्याच्या ठिकाणी विजेची व्यवस्था नाही. गेल्या ४० वर्षांपासून शौचालय, बाथरून तसेच रेस्टरूमची व्यवस्था नाही. पुणे येथील कामगारांना संभावित वेतनवाढीपोटी दरमहा ४०० रुपये अंतरिम वाढ मंजूर करण्यात आली आहे. मात्र, नागपुरात वारंवार पत्र देऊनही ही वाढ लागू करण्यात आली नाही. महागाई भत्ता एप्रिल २०१५ पासून बंद करण्यात आला आहे. पुण्यात वाहन भत्ता दिला जातो. पण नागपुरात दिला जात नाही. लोडर व तिंडेल संवर्गातील कामगारांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या सुट्याही दिल्या जात नाही. वर्षाकाठी फक्त १३ सुट्या मिळतात. कामगारांना दरमहा फक्त ७५ रुपये वैद्यकीय भत्ता व ५ टक्के घरभाडे भत्ता दिला जातो. गणवेशासाठी वर्षाला फक्त १५६ रुपये दिले जातात. धुलाई भत्ता मिळत नाही, आदी प्रश्न बेले यांनी मांडले.आ. सोले यांनी संबंधित प्रश्न अतिशय गंभीर असून याचा परिणाम गोदाम कामगारांच्या जीवनावर होत असल्याचे सांगितले. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करून न्याय देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही संबंधित प्रश्न मांडला जाईल, असेही सोले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सर्व प्रश्न ऐकून घेत गोदाम कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
गोदाम कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय
By admin | Published: October 19, 2015 2:47 AM