मंगेश व्यवहारे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील आदिवासींच्या लोककलेत वारलीची चित्रकला विशेष प्रसिद्ध आहे. आदिवासी समाजाचे लोक सणासुदीला तसेच लग्नसोहळ्याच्या वेळी तांदळाच्या पिठाने कलाकृती साकारत होते. पूर्वी आदिवासींच्या घराघरात वारली कलाकृती दिसायची. कालौघात ही कला आता लुप्त होत आहे. पण नागपुरातील आदिवासी युवकांनी याच कलाकृतीचा आधार घेत, रोजगाराचा मार्ग शोधला आहे. वेगवेगळ्या साहित्यावर वारली कलाकृती साकारून त्याची विक्री करीत आहे. (‘Warli’ employment of tribals; The youth got support)
मोदी कोट, पिशव्या, बॅग, फाइल, फ्रेम या वस्तूंची निर्मिती हे युवक करीत आहेत. या वस्तूंवर वारली कलाकृती साकारत आहे. या वस्तूंना राज्यभरात होणाऱ्या विविध प्रदर्शनातून विक्रीस उपलब्ध करीत आहे. वीर बाबूराव सेडमाके नावाने युवकांनी बचतगटाची स्थापना केली आहे. सात युवक व तीन महिला यात काम करीत आहे. २०१७ मध्ये स्वप्निल मसराम या युवकाने बचतगटाची स्थापना केली. बचतगटाच्या माध्यमातून साहित्य तयार केली जातात. या साहित्याला आकर्षक बनविण्यासाठी वारली कलाकृतीचा आधार दिला जातो.
व्यवसाय सुरू करताना त्याला आदिवासी विभागाच्या केंद्रीय अर्थसाहाय्य योजनेतून मदत झाली होती. त्यातून त्याने वस्तू शिवण्यासाठी मशीन घेतल्या. त्यावर स्क्रीन पेंटिंगच्या माध्यमातून, चित्रकलेच्या माध्यमातून आदिवासींची जीवनदृश्य, त्यांची संस्कृती, शिकारीचे दृश्य, सुगीचा हंगाम, नृत्य, मिरवणूक आदी कलाकृती साकारल्या. मुंबई, पुण्यातील प्रदर्शनात त्यांच्या वस्तू पसंतीस उतरल्या. साहित्य तयार करण्यापासून त्यांच्या वितरणाची जबाबदारी बचतगटातील राहुल मडावी, विलास मंडारे, करण गेडाम, विजय उईके, विजय परतेकी, ज्योती आडे, सुमन मसराम, बबिता धुर्वे हे युवक व महिला करीत आहे.
- कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण
बचतगटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी वारली कलाकृती व साहित्यनिर्मितीचे प्रशिक्षण घेतले. ग्रामीण भागात वारली कलाकृतीची प्रशिक्षणे आयोजित करून महिलांना रोजगार देण्याचे बचतगटाचे प्रयत्न आहे.
- आम्ही ज्या वस्तू तयार करतो त्या वस्तू बाजारपेठेत उपलब्ध आहेतच. पण त्या वस्तूंना आम्ही वारली कलाकृतीद्वारे त्याचे आकर्षक बनवितो. ही कलाकृती टिकावी, लोकांपर्यंत पोहचावी, आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे व आदिवासी महिलांना त्यातून रोजगार मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या फटका व्यवसायाला बसला आहे. अशात आदिवासी विभागाने सहकार्य केल्यास या साहित्यनिर्मितीला मदत होईल.
स्वप्निल मसराम, अध्यक्ष, वीर बाबूराव सेडमाके युवा बचतगट