लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सतरंजीपुरा येथून वानडोंगरी आणि नंतर पाचपावली पोलीस क्वॉर्टरमध्ये क्वारंटाइन केलेल्या संशयिताच्या जेवणात बुधवारी अळी आढळल्याने खळबळ उडाली. या संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.कोरोना विषाणूचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या सतरंजीपुरा भागातील १२६ संशयितांना २५ एप्रिल रोजी वानाडोंगरी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु याला स्थानिक नागरकांसह आमदाराचा विरोध झाला. यामुळे २६ एप्रिल रोजी या संशयितांना पाचपावली पोलीस क्वार्टरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले. सुरूवतीला दोन दिवस चांगले जेवण मिळाले. परंतु बुधवारी दिलेल्या जेवणात अळी निघाल्याने अनेकांनी जेवण तसे टाकून दिले. याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गुलाम मुस्तफा याने सांगितले की, पाचपावली पोलीस क्वार्टरमध्ये सुरूवातीला चांगले जेवण मिळाले. परंतु आता तसे मिळत नाही. वडिलांची प्रकृती खराब आहे. मात्र त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. बाहेरून टिफीनही आणू देत नाही. येथील कर्मचारीही निट वागणूक देत नसल्याचीही तक्रार व्हिडीओतून केली. उपविभागीय अधिकारी शेखर गाडगे यांना याबाबत विचारले असता, त्यांनी अशी तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगितले. परंतु प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.