लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे काेराेना आणि आकाशातून आग ओकणारा सूर्य तापदायक हाेत आहे. हाेळीनंतर तापमानात चांगलीच वाढ हाेत आहे. हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर जिल्हावासीयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या ३ व ४ एप्रिल राेजी जिल्ह्यातील तापमान ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता असून, उष्ण लाट येण्याचा इशारा विभागाने दिला आहे. नागपूरचे शुक्रवारचे तापमान ४० अंश नाेंदविण्यात आले. विदर्भवासीयांसाठी पुढचे पाच दिवस तापदायकच जाणार असून, हा आणि पुढचा मे महिना परीक्षा घेणारा ठरणार आहे.
हाेळीपूर्वीचे काही दिवस नागरिकांना वातावरणाने सुखावले हाेते. पण त्यानंतर अचानक तापमानात ४ ते ५ अंशाची वाढ झाली. ३० मार्चला नागपूरचा पारा थेट ४२ अंशावर पाेहचला. त्यानंतर २ अंश खाली उतरून स्थिर झाला. मात्र विदर्भातील चंद्रपूर जिल्हा तापलेलाच आहे. पुढचे दाेन दिवस त्यात आणखी वाढ हाेणार आहे. शुक्रवारी चंद्रपुरात ४३.६ अंश तापमानाची नाेंद झाली, जी या काळात सर्वाधिक आहे. मात्र येणाऱ्या दाेन दिवसात हीट वेव्हज येतील. जिल्ह्यातील बल्लारपूरचे तापमान ४४.९ पर्यंत तर राजुरामध्ये पारा ४५ अंशापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ब्रह्मपुरी, जिवती व इतर भागात तापमान ४४.९ अंशापर्यंत वाढणार असल्याची नाेंद हवामान विभागाने केली आहे.
दरम्यान, चंद्रपूरनंतर गडचिराेली ४१.६, भंडारा ४१.४, यवतमाळ ४१.७, वर्धा ४१.१, अकाेला ४०.७, अमरावती ४०.२, गाेंदिया व वाशिममध्ये ४० अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. येत्या पाच दिवसात यामध्ये २ ते ३ अंशाची वाढ हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
एप्रिल-मेमध्ये हीट वेव्हज
एप्रिलच्या पुढच्या पंधरवड्यात आणि मे महिन्यात तापमानात आणखी वाढ हाेणार असून, उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मध्य भारतासह उत्तर-पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील, असा अंदाज आहे. चालू दशकात तापमानात चांगलीच वाढ झाली असून, २०१५ ते २०२० ही वर्षे अत्याधिक तापमानाची ठरली. २०२१ या वर्षात आणखी तीव्रता जाणवणार असल्याचा धाेका हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विदर्भात एप्रिल-मे महिन्यात तापमान सरासरीपेक्षा १ ते २ अंशाने वाढण्याची म्हणजे पारा ४५ वर जाण्याची शक्यता आहे. आताच उन्हाचे चटके असह्य वाटत असल्याने येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.