नागपूर : स्टंटबाजी करणाऱ्यांना मध्य रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाईचा ईशारा दिला आहे. शिवडी स्थानकावर एका तरुणाने धावत्या ट्रेनमध्ये केलेल्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे.
एक्सवर पोस्ट केलेल्या शिवडीच्या व्हिडीओत एक तरुण धावत्या ट्रेनमध्ये धोकादायक स्टंटबाजी करताना दिसतो आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत सुरक्षा यंत्रणांना संबंधित तरुणाला शोधून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वडाळा येथील रेल्वे सुरक्षा दलाने संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे, धावत्या रेल्वेत जिवावर उदार होऊन काही जण अधूनमधून स्टंटबाजी करतात अन् ते रिल्स सोशल मिडियावर व्हायरल करतात. काळाजाचा ठोका चुकविणारे हे प्रकार संतापजनकही असतात. अशा बेजबाबदार व्यक्तींवर रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणा कठोर कारवाई का करत नाही, असा प्रश्नही रेल्वे प्रवाशांकडून तसेच सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातो. आताही असाच प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून, यापुढे अशी स्टंटबाजी करणाऱ्याची गय करायची नाही, असा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांना आवाहन !सुरक्षित वातावरणात प्रवाशांना प्रवास करता यावा म्हणून रेल्वे विविध उपाययोजना करीत असते. मात्र, काही समाजकंटक रिल्सच्या भानगडीत स्वत:चा जीव धोक्यात घालून ईतरांनाही अस्वस्थ करतात. धावत्या रेल्वेत किंवा रेल्वे स्थानकावर अशा प्रकारे कुणी स्टंटबाजी करीत असेल तर प्रवाशांनी तातडीने ९००४४१०७३५ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.