नागपूर : विदर्भात मागील तीन दिवसांपासून पारा वाढलेला आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन दिवस पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यात हलका पाऊस सांगितला असला तरी पश्चिम विदर्भात मात्र मेघगर्जनेसह चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.
नागपुरात सकाळी काही काळ वातावरण ढगाळलेले होते. दुपारनंतर कडक उन्ह पडले. शहरातील तापमान ४१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सकाळी आर्द्रता ३१ टक्के तर सायंकाळी २६ टक्के नोंदविण्यात आली. दिवसभर कडक उन्ह असले तरी पारा कालच्यापेक्षा ०.४ अंशाने खालावल्याची नोंद झाली आहे.
या सोबतच, वाशिममध्ये ३९.६, बुलढाणा ३९.८, गडचिरोली ४०.२, यवतमाळ ४१, वर्धा ४१.५, गोंदिया ४१.६, नागपूर आणि अकोला ४१.८, अमरावती ४१.४ तर चंद्रपुरात ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, हवामान विभागाने वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये १६ व १७ मे हे दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.