लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पैसे आकारले जात नसल्यामुळे (टोल फ्री) क्रमांकावर वारंवार फोन करून नियंत्रण कक्षातील महिला पोलिसांशी नाहक संपर्क करू पाहणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.पोलीस नियंत्रण कक्ष हे पोलीस दलाचे महत्त्वाचे तेवढेच संवेदनशील स्थळ असते. तेथून शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती आणि विविध पोलीस ठाण्याला दिशानिर्देश दिले जातात. अडचणीत असलेल्या नागरिकांना तसेच अपघात किंवा गुन्हा घडला त्या ठिकाणांवर तातडीने पोलीस पाठविण्यासाठी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असते. संकटकाळी कुणालाही तातडीने मदत मिळवता यावी म्हणून इथला १०० क्रमांक टोल फ्री असतो. त्यावर फोन केल्यास पैसे लागत नाही. त्याचा गैरफायदा काही मनोविकार जडलेली मंडळी भलत्याच कामासाठी घेतात. वारंवार येथे फोन करून तेथील महिला पोलिसांशी नको त्या भाषेत बोलतात. तातडीने माहिती देऊन फोन ठेवत नाही तर कारवाईचा दम देऊनही विनाकारण वाद घालतात. त्यामुळे ही लाईन व्यस्त होते आणि अडचणीतील व्यक्तीला तातडीने नियंत्रण कक्षात संपर्क करता येत नाही.बराच वेळ त्याला फोन व्यस्त असल्याचे ऐकावे लागते. नियंत्रण कक्षात असे फोन करणाऱ्यांची संख्या अन् गैरप्रकार वाढल्याने अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.
तीन दिवसात एकेकाचे ५० कॉल्सवारंवार एकाच क्रमांकावरून फोन करणाऱ्या एक डझन ‘आंबटशौकिनांचा’ पोलिसांनी शोध घेतला. त्यातील एकेकाने तीन दिवसात कुणी १० तर कुणी ५० कॉल्स केले. त्या सर्वांना शोधून सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी पकडल्यानंतर संबंधितांचे धाबे दणाणले. त्यांनी सहआयुक्तांना पुन्हा कधीच कॉल करणार नाही अन् असभ्य भाषेचा वापर करणार नाही, अशी हमी दिल्यामुळे त्यांना ताकीद देऊन सोडून देण्यात आले.