नागपूर : वन विभागाच्या बदल्यांमधील गोलमाल हा नेहमीचाच भाग झाला आहे. कधी अधिकारी, तर कधी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा घोळ चव्हाट्यावर आला आहे. अशाच वन विभागाच्या अजनी येथील कंटेनर डेपोमध्ये अलीकडेच झालेल्या एका वनपालाच्या बदलीवरू न सध्या वन विभागात प्रचंड वादळ उठले आहे. नागपूरच्या उपवनसंरक्षक कार्यालयाने मागील २९ सप्टेंबर रोजी एक आदेश जारी करू न वनपाल डी. टी. चौधरी यांची सेमिनरी हिल्स वन परिक्षेत्र कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या अजनी कंटेनर डेपो येथे बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी चौधरी हे बुटीबोरी वन परिक्षेत्रातील चारगाव येथे कार्यरत होते. येथे त्यांना एक वर्षही पूर्ण झाले नव्हते. मात्र असे असताना त्यांची येथे तडकाफडकी बदली करण्यात आली. अजनी कंटेनर डेपोमधील पद हे मलाईचे समजल्या जाते. येथे विदेशातून येणाऱ्या लाकडांना परवाना दिल्या जातो. त्यामुळे येथील पदावर बसण्यासाठी वन अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. येथील पूर्वीचे वनपाल जी.आर. रामटेके यांच्या निवृत्तीपासून हे पद रिक्त होते. मात्र यापदी वन विभागातील एखाद्या अनुभवी व्यक्तीची नियुक्ती होईल, असा कयास लावला जात होता. परंतु मागील महिन्यात अचानक नियुक्तीच्या हालचालींना वेग आला आणि चौधरी यांची नियुक्ती झाली. माहिती सूत्रानुसार राजकीय हस्तक्षेप व वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या मर्जीतून ही बदली झाल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे चौधरी यांच्या नियुक्तीला काही वन अधिकाऱ्यांनी तीव्र विरोधही केला होता. यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वातावरण तापले होते.मात्र शेवटी उपवनसंरक्षक कार्यालयाला २९ सप्टेंबर रोजी बदली आदेश जारी करणे भाग पडले. मात्र त्या आदेशातील संदर्भ म्हणून उल्लेख करण्यात आलेल्या काही धक्कादायक गोष्टींचा भंडाफोड झाला आहे. त्याचवेळी कापसी (खुर्द ) येथील क्षेत्र सहायक आर.एल. मिश्रा नुकतेच काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले असून, त्यांच्या जागी बसण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. (प्रतिनिधी)
वनपालाच्या बदलीचा गोलमाल!
By admin | Published: October 27, 2015 3:50 AM