लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी व ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांनी गुरुवारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी त्यांची कारागृहात रवानगी केली.विशेष न्यायालयाने भुते यांना विशिष्ट अटींसह जामीन मंजूर केला होता. दरम्यान, अटींचा भंग झाल्यामुळे २७ नोव्हेंबर २०१७ रोजी न्यायालयाने भुते यांचा जामीन रद्द करून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केला होता. तसेच, अटींमध्ये बदल करण्याचा भुते यांचा अर्जही फेटाळला होता. त्याविरुद्ध भुते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले होते. ३० नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे अपील खारीज केले. त्यानंतर भुते यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण त्यांना तेथेही दिलासा मिळाला नाही. परिणामी, त्यांनी विशेष न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्याचवेळी त्यांनी जामीन अर्जही दाखल केला. त्यासोबतच्या अन्य अर्जात त्यांनी तात्पुरता जामीन मिळण्याची विनंती केली असून त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयात भुते यांच्यातर्फे अॅड. देवेंद्र चव्हाण तर, सरकारतर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली.
वासनकर घोटाळा : अविनाश भुते यांचे आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 7:52 PM
वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी व ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांनी गुरुवारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी त्यांची कारागृहात रवानगी केली.
ठळक मुद्देकारागृहात रवानगी : जामीन अर्जही दाखल केला