सीबीआयकडून तपासणी : उलटसुलट चर्चेला उधाण नागपूर : रेल्वेस्थानकावरील विकासकामात गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी रेल्वेस्थानकावरील विकास कामांची तपासणी केली. सीबीआयच्या पथकासोबत मध्य रेल्वेचे सतर्कता पथक आणि बांधकाम विभागाचेही वरिष्ठ असल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकाला ‘वर्ल्ड क्लास रेल्वेस्टेशन‘ बनविण्याची केंद्र सरकारने घोषणा केली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर आणि परिसरात विकासकामांचा धडाका लागला आहे. ८ कोटी रुपयांचा खर्च ८ व्या क्रमांकाचा होम प्लॅटफार्म तसेच त्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी झाला आहे. त्यासोबतच एस्केलेटर, पॅसेंजर लाऊंज आदी मोठ्या कामांवरी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याची जोरदार चर्चा होती. तशी ओरड अन् तक्रारही संबंधितांकडे करण्यात आल्याची कुजबूज होती. मात्र, तक्रारी दुर्लक्षित करण्यात आल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर काहींनी सीबीआयकडे तक्रार केल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, ही चर्चा आता थंड झाली असताना गेल्या दोन दिवसांपासून सीबीआयच्या पथकाने नागपूर रेल्वेस्थानकावरील विकास कामांची पाहणी आणि तपासणी केल्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयच्या पथकासोबत मध्य रेल्वेच्या मुंबई झोनमधील व्हिजीलन्सचे अधिकारी तसेच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारीही होते. हे पथक रेल्वेस्थानकावरील विकासकामांची तपासणी करण्यात व्यस्त असताना रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. या तपासणीतून मोठा आर्थिक घोटाळा पुढे येण्याची शक्यता मात्र काही जण वर्तवित होते. या संदर्भात अधिक माहितीसाठी सीबीआयच्या सूत्रांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. तर, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले. (प्रतिनिधी)
रेल्वेस्थानकावरील कामात गैरव्यवहार ?
By admin | Published: August 22, 2015 2:56 AM