लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तलावात सांडपाणी सोडले जाते. यामुळे तलावात ऑक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर धोक्यात आले आहे. परंतु फुटाळा व नाईक तलावांचा लवकरच कायापालट होणार आहे. तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद करून तलावातील कचरा व वनस्पती बोटीच्या साह्याने बाहेर काढली जाणार आहे. निवडणूक आचार संहिता संपल्यानंतर महापालिका हा प्रकल्प राबविणार आहे.पर्यावरण संस्थांनी तलावाचे निरीक्षण केले आहे. यात फुटाळा व नाईक तलावात आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले होते. याचा विचार करता नीरीने फुटाळा तलाव संवर्धनाबाबतचा अहवाल महापालिकेला दिला आहे. यात तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी रोखून पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.तसेच तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढावे, यासाठी बोटीच्या साह्याने कचरा बाहेर काढला जाणार आहे. यावर १.५० कोटींचा खर्च येणार आहे. तसेच १.५० कोटीची यंत्रसामुग्री खरेदी केली जाणार आहे. तसेच लवकरच नाईक तलाव संवर्धनाचे काम हाती घेतले जाणार आहे. तलाव संवर्धनासाठी हुडको ७५ लाखांचा निधी उपलब्ध करणार आहे. तसेच महापालिका ७५ लाख खर्च करून यासाठी यंत्रसामुग्रीची खरेदी महापालिका करणार आहे. फुटाळा तलाव संवर्धनाचा नीरीने प्रस्ताव दिल्याला आयुक्त अभिजीत बांगर यांनी दुजोरा दिला आहे.
पाच बोटी खरेदी करणारफुटाळा, अंबाझरी, गांधीसागर, सोनेगाव, सक्करदरा, लेंडी तलाव, नाईक तलाव, गोरेवाडा आणि पांढराबोडी तलाव यासह सर्वच तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी रोखून तलावातील कचरा व विषारी वनस्पती बाहेर काढण्यासाठी महापालिका पाच बोटी खरेदी करणार आहे.लोकसहभागातून सक्करदरा तलाव स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या धर्तीवर शहरातील इतर तलाव स्वच्छ क रण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणारतलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने त्याचा परिणाम जलचरावर होतो. फुटाळ्यात मोठ्याप्रमाणात झालेले विसर्जन लक्षात घेता, येथे मोठ्या मूर्ती विसर्जनाला निर्बंध घालण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासाठी जनजागृती केली जाणार आहे. तसेच फुटाळ्यातील बंद पडलेले कारंजे सुरू केले जाणार आहे. बोटींच्या साहाय्याने तलावातील पाणी शुद्ध करण्यात येणार आहे. तलाव सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. भविष्यात फुटाळा तलाव हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरणार आहे.