लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वच राजकीय पक्ष व उमेदवार बाजी मारण्यासाठी कामाला लागले आहेत. विविध स्तरावर प्रचार-प्रसारासह मतदारांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत. तर दुसरीकडे उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारासाठी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. उमेदवारांच्या खर्चाचे संनियंत्रण करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याकडे उमेदवाराला आपल्या खर्चाचा हिशेब सादर करावयाचा आहे.निवडणूक म्हटली की खर्च आलाच. कित्येक उमेदवार निवडणुकीत पैसा खर्च करण्यात मागे-पुढे पाहत नाही. निवडणुकीत पैशांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही वेळोवेळी होत असतो. तो चुकीचाही नाही. पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी आयोगाने कंबर कसली आहे. निवडणूक कामासाठी मोठी यंत्रणा राबवावी लागत असल्याने निवडणुकीवरील खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सध्या खर्चासाठी आयोगाने जिल्हा प्रशासनला १६ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. टी.एन. शेषन मुख्य निवडणूक आयुक्त असताना त्यांनी उमेदवारांच्या वारेमाप खर्चावर नियंत्रण आणले होते. उमेदवारांना खर्चाचा, हिशेब देणे, उत्पन्नविषयक प्रमाणपत्र देणे सक्तीचे केले. सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे. उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या प्रत्येक हालचाली व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये टिपल्या जाणार आहेत.
उमेदवारांचे शपथपत्र मतदान केंद्रांवर लागणारनिवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला शपथपत्र भरून द्यावयाचे आहे. त्यात शिक्षण, त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची नोंद, संपत्तीची माहिती असणारे शपथपत्र प्रत्येक मतदान केंद्रांवर लावण्यात येणार आहे. निवडणुकीत अधिक विश्वासार्हता आणि पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आपला प्रतिनिधी कसा आहे. आपण ज्यांना मतदान करणार आहोत, तो उमेदवार कसा आहे, हे मतदाराला कळावे, या उद्देशातून निवडणूक विभागाने हे पाऊल उचलले आहे.
२५ हजार रुपये डिपॉझिट भरावे लागणारलोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने प्रवर्गानुसार डिपॉझिटच्या रकमा जाहीर केल्या आहेत. खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला २५ हजार रुपये डिपॉझिट भरावे लागणार आहे. अनुसूिचत जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना १२,५०० रुपये डिपॉझिट भरावे लागणार आहे.