पालकमंत्र्यांनी केली पाहणी : नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय हवामान विभागाने गुरुवारी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार पावसाने नागपुरात दमदार हजेरी लावली. अनेक चौकात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने विविध चौकात साचलेले पाणी काढले. या कामात त्यांना नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत झाली. मनपा अधिकाऱ्यांनी श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर (सीओसी) मधून शहराचा आढावा घेत कर्मचाऱ्यांना पाठवून पाण्याचा निचरा करण्यास मदत केली.
पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी गुरुवारी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. मनपाच्या आरोग्य विभागाने सार्वजनिक आरोग्य व अभियांत्रिकी विभाग व अग्निशमन विभागाचे अधिकारी सीओसीच्या माध्यमातून नागपूरातील विविध चौकात साचलेल्या पाण्याचा आढावा घेतला. झोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमाने पाण्याचा निचरा करण्याचे काम करतात अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.
शहरात ३६०० कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याचे ‘लाईव्ह फुटेज’ सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या व्हिडियो वाॅल वर दिसतात. त्यानुसार यंत्रणेने मेडिकल चौक, शंकरनगर चौक, इंडियन कॉफी हाऊस चौक सदर, जगनाडे चौक, पडोळे चौक व इतर ठिकाणी साचलेल्या पाण्याबाबत झोनच्या टीम ला सांगून रस्ता वाहतुकी योग्य केला.
यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, नगरसेवक किशोर जिचकार, जुल्फीकार भुट्टो, पुरुषोत्तम हजारे, नगरसेविका नेहा निकोसे, माजी नगरसेवक मनोज सांगोळे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार,मुख्य अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके, स्वच्छता विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, स्मार्ट सिटीचे महाप्रबंधक डॉ. शील घुले, अनुप लाहोटी, आरती चौधरी उपस्थित होते.
....
या क्रमांकावर करा तक्रार
आपल्या परिसरात पाणी साचल्यास मनपाच्या आपात्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी ०७१२-२५६७०२९, २५६७७७७ आणि अग्निशमन विभागाच्या ०७१२-२५४०२९९, ०७१२-२५४०१८८, १०१, १०८, ७०३०९७२२०० या क्रमांकांवर संपर्क साधावा.असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.