लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्याची तयारी झाल्यासंदर्भातील मनपाच्या दाव्यांवर गुरुवारी झालेल्या पावसाने पाणी फेरले. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. इतकेच काय तर अनेक महत्त्वाच्या चौकांना तलावाचे स्वरूप आले होते. दक्षिण-पश्चिम नागपूर तसेच पूर्व नागपुरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.
जागोजागी रस्ते, सखल भाग, रिकामे प्लॉट्स, रुग्णालये इतकेच काय पण अनेक धार्मिक स्थळांमध्येदेखील पाणी साचल्याचे दिसून आले. पावसाळ्याशी सामना करण्याची तयारी झाल्याचे दावे मनपाच्या अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र त्यांच्या या दाव्यांची पावसामुळे ‘पोलखोल’ झाली. सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत शहरातील अनेक भाग अक्षरश: ‘ब्लॉक’ झाले होते.
सकाळच्या सुमारासच शहरात पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाने मोठे स्वरुप धारण केले. दुपारी २ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. सकाळी ८.३० वाजेपासून ते दुपारी २.३० पर्यंत शहरात ९४.२ मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील विविध नाले ‘ओव्हर फ्लो’ झाले होते तर बऱ्याच वस्त्यांमधील सखल भागात पाणी साचले होते.
पावसामुळे शंकरनगर, भेंडे ले-आऊट, खामला, छत्रपती नगर, बजाज नगर, अत्रे ले-आऊट, त्रिमूर्तीनगर, पडोळे चौक, तात्या टोपे नगर येथील रस्त्यांना अक्षरश: तलावाचे स्वरूप आले होते.
चाकरमान्यांची अडचण
सकाळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे चाकरमान्यांची प्रचंड अडचण झाली. अनेकांना पावसात ओले होतच कार्यालयात जावे लागले. पाण्यातून रस्ता काढताना नागरिकांच्या नाकी नऊ येत होते. विशेष म्हणजे शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक सिग्नलदेखील या कालावधीत बंद होते.
‘पॉश’ वस्त्यांमध्ये रस्त्यांवर तलाव
रामदासपेठ, धंतोली, लक्ष्मीनगर, धरमपेठ हे शहरातील ‘पॉश’ भाग म्हणून ओळखले जातात. मात्र पावसामुळे या भागांमध्येदेखील प्रचंड अडचण झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते.
पाणी साचण्याची मुख्य कारणे
-निचऱ्याची व्यवस्था नाही
-गडरची सफाई नाही
-नवीन सिमेंट मार्गांवर कडेला पाईप नाहीत
-नवीन मार्गांमुळे रस्त्यांचा उंचवटा वाढला. परिणामी पाणी थेट घरात
-नाल्यांची स्वच्छता नसल्यामुळे तुंबण्याचे प्रकार
-खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत.
-वाढते अतिक्रमण
-नियोजनाचा अभाव