गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिकेतर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. यातूनच शहराच्या विविध भागात ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर कंपन्यांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने दोन वर्षापूर्वी १५० वॉटर एटीएम लावण्याचा निर्णय घेतला. प्रायोगिक तत्त्वावर हैदराबाद येथील वॉटर हेल्थ प्रायव्हेट लि. कंपनीला शहरात सहा ठिकाणी वॉटर एटीएम लावण्यास परवानगी दिली होती. कंपनीने सहा ठिकाणी एटीएम उभारले. परंतु काही दिवसातच बंद पडले. तर काही लावल्यापासून सुरूच न झाल्याने आज शो-पीस बनले आहेत.
गांधीबाग येथील पन्नालाल देवडिया स्कूलजवळ, महाल, तहसील कार्यालय, मेयो रुग्णालय, केडीके कॉलेजजवळ, आयसोलेशन हॉस्पिटल यासह अन्य ठिकाणी वॉटर एटीएम उभारण्यात आले. मोठा गाजावाजा करून केडीके कॉलेजजवळील एटीएमचे उद्घाटन तत्कालीन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी शहरात १५० एटीएम लावण्याची घोषणा केली होती. मात्र यातील काही ठिकाणचे एटीएम लावल्यापासून सुरूच झालेले नाही. आयसोलेशन हॉस्पिटलजवळ लावण्यात आलेले एटीएम सुरू झाले नाही. यामुळे मनपाच्या जागा अडकून पडल्या आहेत.