लाेकमत न्यूज नेटवर्क
हिवराबाजार : रामटेक तालुक्यातील हिवराबाजार-देवलापार मार्गावरील नदीवर असलेल्या पुलावरून नेहमीच पुराचे पाणी वाहात असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प हाेते. यात नागरिकांना तासन्तास अडकून राहावे लागते. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी हिवराबाजार परिसरातील नागरिकांनी केली आहे.
हा संपूर्ण भाग आदिवासीबहुल असून, देवलापार (ता. रामटेक) येथे ग्रामीण रुग्णालय, पाेलीस ठाणे, अप्पर तहसील कार्यालय, वन विभाग कार्यालय, महावितरण कंपनीचे कार्यालय, बॅंक यासह अन्य शासकीय कार्यालये व शाळा असल्याने या भागातील हिवराबाजार, फुलझरी, सालई, टांगला, आकाेला, वरघाट यासह एकूण १२ गावांमधील नागरिकांना शासकीय कामांसाठी तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देवलापारला जाण्यासाठी याच पुलावरून प्रवास करावा लागताे.
या मार्गावरील छाेट्या नदीवर अंदाजे २५ वर्षापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले असून, त्याला सिमेंटच्या पायल्या लावण्यात आल्या आहेत. आधीच पुलाची उंची कमी, त्यातच पायल्यांमध्ये कचरा व रेती अडकत असल्याने त्यातून पाणी वाहून जात नाही. त्यामुळे ते पाणी पुलावरून वाहते. पायल्यांमध्ये अडकलेली रेती व कचरा साफ करण्याशिवाय कुठलीही कामे केली जात नाही. निर्मितीपासून आजवर या पुलाची दुरुस्तीदेखील करण्यात आली नाही.
पावसाळ्यास हलक्या स्वरुपाचा पाऊस काेसळल्यास पुलावरून पाणी वाहात असल्याने या मार्गावरील सर्व गावांचा संपर्क तुटताे.त्यामुळे दरवर्षी नागरिकांना मनस्ताप व त्रास सहन करावा लागताे. संरक्षक कठडे नसलेला हा पूल तसाही धाेकादायक बनला आहे. गुरुवारी (दि. ८) सकाळी काेसळलेल्या पावसामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प हाेती. परिणामी, या नदीवर उंच पूल बांधण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.